वाघेश्वर मंदिर तळ्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन नाही

वाघोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जन करताना होणारी गर्दी टाळण्यासाठी वाघोली येथील वाघेश्वर मंदिर तळ्यामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन रथ तयार करण्यात आले आहे. वाघोलीमध्ये घरोघरी विसर्जन रथ फिरणार असून त्याठिकाणी कृत्रिम हौदामध्ये किंवा विहिरींमध्ये मुर्त्यांचे विसर्जन करावे लागणार आहे. वाघोलीतील गणेश मूर्तींचे विसर्जन पाचव्या, सातव्या, नवव्या, दहाव्या व अकराव्या दिवशी केले जाते. बुधवारी पाचवा दिवस असल्याने मुर्त्यांच्या विसर्जानास सुरुवात होणार आहे. दरवर्षी वाघेश्वर मंदिराच्या तळ्यामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे विसर्जनाच्या वेळेस होणारी गर्दी लक्षात घेता वाघेश्वर तळ्यामध्ये मूर्तींचे विसर्जन करता येणार नाही.