पुण्यात तूर्तास लॉकडाऊन नाही ; …पण नियम पाळा अन्यथा २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील अजित पवारांनी दिली तंबी

कोरोनाची स्थिती गंभीर असून मास्क, फिजिकल डिस्टन्स याचे काटेकोरपणे पालन केले जावे. लग्नाच्या कार्यंक्रमासाठी ५० पेक्षा अधिक संख्या चालणार नसल्याची तंबी ही अजितदादांनी यावेळी दिली आहे. तसेच वाढत्या आकडेवारीमुळे ५० टक्के खासगी बेड ताब्यात घेण्यात येणार असून १६ लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

    पुणे: वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे पुण्यात लॉकडाऊन होणार की नाही यावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बैठकीत आजही कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, नागरिकांचे वर्तन पुढील ५-६ दिवस सुरु राहिले तर २ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहून २ एप्रिलच्या आधी आणखी एक आढावा बैठक घेऊनच लॉकडाऊनचा निर्णय घ्यायचा का नाही हे ठरविण्यात येणार आहे. दरम्यान पुण्यात १ एप्रिल ते १४ एप्रिल काळात कडक लॉकडाऊन (lockdown)करण्याची मागणी प्रशासन करत होते. मात्र, यास अजित पवारांनी विरोध दर्शविला.

    कोरोनाची स्थिती गंभीर असून मास्क, फिजिकल डिस्टन्स याचे काटेकोरपणे पालन केले जावे. लग्नाच्या कार्यंक्रमासाठी ५० पेक्षा अधिक संख्या चालणार नसल्याची तंबी ही अजितदादांनी यावेळी दिली आहे. तसेच वाढत्या आकडेवारीमुळे ५० टक्के खासगी बेड ताब्यात घेण्यात येणार असून १६ लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

    आरटीपीसीआर चाचण्याचे अहवाल येण्यासाठी तीन-चार दिवसांचा कालावधी लागत आहे. नेमके किती ‘खरे’ पॅाझिटिव्ह आहेत याचा आढावा आता घेतला जाणार आहे. खासगी प्रयोगशाळेकडून दिल्या जाणाऱ्या अहवालाची तपासणी आता त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासुन रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. दर दिवशी ६ हजारांच्या पुढे ही रुग्णवाढ गेली आहे. यातल्या अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत केल्या जात आहेत. यातल्या अनेक लोकांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळा आयसीएमआरचे निर्बंध पाळतात का याची तपासणी आता केली जाणार आहे. आज एकुण रुग्णसंख्या लक्षणे याचा आढावा घेण्यात आला. त्यात हा निर्णय घेतला गेला आहे.