भाजपच्या राजवटीत एकही दिखाऊ विकासकाम नाही ; अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधाऱ्यांना ‘घरचा आहेर’

पिंपरी - चिंचवड महापालिकेचा सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षांचा मूळ ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार ११२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केला होता. त्याला स्थायी समितीने २५० कोटी रुपयांच्या उपसूचना देत २४ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. तसेच, अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली.

  पिंपरी : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात २७ विकासकामांची घोषणा केली. गेल्या चार – साडेचार वर्षात त्यातील किती कामे पूर्ण झाली, याचा जाब आता नागरिक विचारतील. पाच वर्षात ३० हजार कोटीहून अधिक रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली खरी मात्र, शहरात पाच वर्षात एकही दिखाऊ काम झाले नाही. अथसंकल्प फुगीर असून प्रत्यक्षात विकास कामे शून्य झाली आहेत. सत्ता असूनही प्रभागाच्या कामात दुजाभाव केला जातोय, पुरेशी तरतूद ठेवली जात नाही, अशा शब्दात भाजपच्याच नगरसेवकांनी अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले. तर, भाजपने केवळ रेघोट्या ओढण्याचे काम केले. कॉपी पेस्ट आणि अक्कलशुन्य अर्थसंकल्प आहे, अशी टीका विरोधकांनी केली. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी सूर आळविल्याने खऱ्या अर्थाने ‘इलेक्शन इअर’ला सुरुवात झाल्याचे पाहायले मिळाले.

  पिंपरी – चिंचवड महापालिकेचा सन २०२१ – २२ या आर्थिक वर्षांचा मूळ ५ हजार ५८८ कोटी ७८ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह ७ हजार ११२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश पाटील यांनी १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला सादर केला होता. त्याला स्थायी समितीने २५० कोटी रुपयांच्या उपसूचना देत २४ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली. तसेच, अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस केली. त्यावर शुक्रवारी (दि.२६) विशेष सभेत चर्चा झाली. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या. स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी अर्थसंकल्प महापालिका सभेपुढे मांडला. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले असून रुग्ण वाढ सुरूच आहे. याचे भान ठेवून प्रत्येक नगरसेवकाने पाच मिनिटे बोलावे, अशी सूचना महापौरांनी सुरुवातीलाच केली.

  सचिन चिखले म्हणाले, माझ्या प्रभागात निधी कमी दिला आहे.या अर्थसंकल्पातून निराशा झाली आहे. राष्ट्रवादीचे पंकज भालेकर म्हणाले, आमच्या प्रभागाला रेडझोनचे कारण देऊन बजेट कमी दिले आहे. रेडझोनच्या नावाखाली कायमच अन्याय केला जात आहे. भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, प्रभाग क्रमांक २१ मधील प्रत्येक कामाला केवळ एक हजार रुपये टोकन ठेवले आहे. पिंपरीसाठी पाच वर्षात नाममात्र निधी दिला. पिंपरीला कायम वंचित ठेवले. महापालिका कोणाच्या बापाची नाही. भाजपने जाहीरनाम्यात २७ कामे जाहीर केली होती. त्यातील किती पूर्ण झाली, याचा जाब आता नागरिक विचारतील. पाच वर्षात ३० हजार कोटीहून अधिक बजेटला मंजुरी दिली. शहरात पाच वर्षात एकही दिखाऊ विकास काम केले नाही. राष्ट्रवादीचे भाजपसोबत साटेलोटे आहे.

  नीता पाडाळे म्हणाल्या, प्रभागातील रस्ते कामांना तरतूद ठेवली नाही. राष्ट्रवादीच्या अपर्णा डोके म्हणाल्या, मूलभूत गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. अर्धवट प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. शिवसेनेचे प्रमोद कुटे म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी बजेटमध्ये काहीच नाही. शहरात पाहण्यासारखे काहीच नाही. पर्यटन स्थळांचा विकास केला जात नाही. आकुर्डीतील पालखी स्थळाच्या विकासासाठी तुटपुंजी तरतूद केली आहे. याचा मी निषेध करतो. राष्ट्रवादीचे विनोद नढे म्हणाले, काळेवाडीकरांवर चार वर्षांपासून अन्याय केला जात आहे. प्रभागात राष्ट्रवादीचे नगरसेवक असल्याने पक्षीय राजकारण करत आमच्यावर अन्याय केला जातो. भाजपच्या सुजाता पालांडे म्हणाल्या चार वर्षांपासून बजेटसाठी झगडत आहोत. विशेष प्रकल्पसाठी काहीच दिले नसून हा अन्याय आहे. भाजपचे सचिन चिंचवडे यांनीही प्रभागात डांबरीकरण, इतर कामांसाठी पुरेशी तरतूद नसल्याचे सांगितले. बोगस एफडीआर देऊन महापालिकेची फसवणूक करणारे ठेकेदार आजही कामे करत आहेत. उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना काळ्या यादीत टाकावे. भाजपच्या स्वीनल म्हेत्रे यांनीही विकास कामासाठी पुरेशी तरतूद नसल्याचे सांगितले. भाजपचे अंबरनाथ कांबळे यांनी प्रभागात कमी कामे झाल्याची तक्रार केली.

  राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले, भूसंपादनासाठी १५० कोटी मूळ तरतूद होती. मात्र, उपसूचनेद्वारे त्यात १०४ कोटी रुपयांची घट केली. बजेट फुगीर आहे. भाजपच्या आशा शेंडगे यांनी बजेट खर्ची का पडत नाही असा सवाल करत नदी सुधार प्रकल्प कागदावरच आहे. मग, सत्ता राष्ट्रवादीची असो की भाजपची असा सूर आळविला. भाजपचे अभिषेक बारणे संथ गतीने चाललेली विकास कामे जलद गतीने करण्याची सूचना केली. राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर म्हणाल्या, विशेष योजनावरील निधीचे आकडे फुगविले आहे. भाजपने केवळ रेघोट्या ओढण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या, निराशाजनक बजेट आहे. निधीत मोठी तफावत आहे. शहरातील नागरिकांना उपयोगी पडेल असा एकही प्रकल्प नाही. कॉपी पेस्ट आणि अक्कलशुन्य बजेट आहे. भाजपच्या शैलजा मोरे म्हणाल्या, मी असमाधानी आहे. प्रभागाला बजेट दिले नाही. रंगीत ब्लॉक बसवू शकत नाही ही आमची शोकांतिका आहे.

  शिवसेनेचे राहुल कलाटे म्हणाले, सत्ताधारी भाजप नगरसेवकांनीच अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले आहेत. चार वर्षात पाणी प्रश्न का सुटला नाही. बजेटमध्ये नवीन काहीच नाही. सर्व उपसूचना स्विकारायला हव्यात. भाजपचे शत्रुघ्न काटे म्हणाले,नदी सुधार प्रकल्पासाठी काम करा. अधिकारी कामे करत नाहीत, म्हणून सत्ताधारी असूनही विरोधात बोलावे लागते. राहुल जाधव म्हणाले, महापालिकेत १९९७ मध्ये गावे समाविष्ट झाली. मात्र, गेल्या चार वर्षात या गावांना न्याय मिळाला. त्यांचा विकास झाला.