कोयत्याचा धाक दाखवून कार व पैशांची चोरी करणारे चोरटे जेरबंद

तिघांना एलसीबी व लोणीकंद पोलिसांनी केली अटक
वाघोली : औरंगाबाद येथे जायचे आहे असे सांगत भाडे तत्वावर इरटीगा कार घेऊन आलेल्या चालकाला चाकू, कोयत्याचा धाक दाखवून कार व पैशांची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह तिघांना लोणीकंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वाघोली येथील बकोरी फाटा येथे चोरीची घटना घडली होती.सागर नवनाथ पिंगळे (वय, २५), भूषण शरद माळी (वय, १९) आणि अल्पवयीन मुलगा (तिघेही रा. वाडा पुनर्वसन, कोरेगाव भीमा) असे जबरी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली हद्दीतील बकोरी फाटा येथे तीन अज्ञात व्यक्तींनी औरंगाबाद येथे जायचे आहे, असे सांगून एक इरटीगा कार भाडेतत्वावर मागवली. गाडीत बसल्यानंतर चालकाला चाकू, दोरी, कोयता गळ्याला लावला त्यानंतर गाडी एका सोसायटीच्या खाली नेऊन चालकाला जबर मारहाण करत त्याच्या जवळची रक्कम काढून घेतली आणि बँक खात्यातील दहा हजार रुपये गुगल पे मार्फत चोरट्यांनी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. चोरट्यांनी इरटीगा कार घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढल्यानंतर चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

-गुन्ह्यातील कार जप्त
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना लोणीकंद पोलिस ठाण्याचे समीर पिलाणे आणि दत्ता काळे यांना संशयित कोरेगाव भीमा येथे असल्याचे कळाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणीकंद पोलिस यांनी सापळा रचून तिघांना जेरबंद केले आणि गुन्ह्यातील कार देखील जप्त केली आहे. सदरची कारवाई हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.