theft

पुण्यातील चोरटे नवंनवी कमाल करत पोलीसांसमोर आव्हान उभे करत आहेत. त्यानंतर आता चोरीच्या मालावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

    पुणे : पुण्यातील चोरटे नवंनवी कमाल करत पोलीसांसमोर आव्हान उभे करत आहेत. त्यानंतर आता चोरीच्या मालावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. मामलेदार कचेरीत हवेली पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल विभागातून चोरट्यांनी २८ हजारांचा ऐवज चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वर्दळीच्या ठिकाण असलेल्या या भागातून चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.

    याप्रकरणी दिलीप गायकवाड यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हवेली पोलीस ठाण्यात अंमलदार आहेत. दरम्यान, जुने हवेली पोलीस ठाण्याचा मुद्देमाल विभागाचा काही भाग येथील जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीत आहे. येथे चोरांना पकडून त्यांच्याकडून जप्त केलेला माल ठेवला जातो.

    यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी खोलीच्या छताची कौले काढून आत प्रवेश केला. त्यांनी १५ किलो ऍल्युमिनियमच्या पट्ट्या, तांब्याची ४५ किलो तार, गॅस सिलिंडर, ७० लोखंडी पत्रे, तांब्याची ४०० फूट लांबीची काटेरी तार, २२५ किलो शिशाच्या लाद्या आणि ४०० किलो वजनाच्या ऍल्युमिनियमच्या लाद्या पळवून नेल्या. हा माल गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेला होता. चोरांनी वाहनातून हा माल पळवला असल्याचा अंदाज आहे.

    दरम्यान, हवेलीचे नवीन पोलीस ठाणे सिंहगड रोडला स्थलांतरित झाले आहे. पोलिसांची वर्दळ असतानाही चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत तपास करत आहेत.