sand mafias

बुधवार (ता.१६) रोजी दुपारी तीनच्या सुमारास दौंड तालुक्यातील मलठण हद्दीतील राखीव वन क्षेत्रातील वाळू उपसावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला होता, यावेळी एकूण आठ बोटी जप्त करण्यात आल्या होत्या, या जप्त करण्यात आलेल्या आठ फायबर बोटींची किंमत ५० लाखांच्या घरात असल्याचे समजत आहे.

दौंड : दौंड तालुक्यातील मलठण येथील राखीव वनक्षेत्र (forest department) हद्दीतील वाळू माफियांवर (sand mafias) केलेली कारवाई बदल अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याने वन विभागाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावेळी मलठण येथील भीमा नदीच्या (Bhima river) पत्रातील वाळू उत्खननवरील कारवाई करण्यासाठी पुणे विभागाचे सहायक वन संरक्षक संजय कडू. वन उप-संरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे. वनपाल चेतन कांबळे व आदी स्थानिक वनरक्षक उपस्थित होते.

बुधवार (ता.१६) रोजी दुपारी तीनच्या सुमारास दौंड तालुक्यातील मलठण हद्दीतील राखीव वन क्षेत्रातील वाळू उपसावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी एकूण आठ बोटी जप्त करण्यात आल्या होत्या. या जप्त करण्यात आलेल्या आठ फायबर बोटींची किंमत ५० लाखांच्या घरात असल्याचे समजत आहे. यामुळे वाळू माफियांनी बोटी नष्ट न करता आर्थिक देवाणघेवाण करून विषय मिटवण्यासाठी तगादा लावला. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंधाराचा फायदा घेत बोटी सोडण्यासाठी वाळू माफियांकडून १० लाख रुपये घेतले असल्याची चर्चा तालुक्यात चालू झाली आहे. यामुळे वन विभागाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तसेच मलठण येथील राखीव वन क्षेत्रात वाळू उपसा चालू असल्याची कल्पना स्थानिक वन कर्मचारी यांना असताना तालुका वन विभाग मूग गिळून गप्प का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाळू उपसा वरील कारवाईला पन्नास तास उलटूनही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याने अनेक तर्क लावले जात आहे. वन विभागाच्या कारवाई बदल स्थानिक नागरिकांनी हा वन विभागावर हल्ला नसून वन विभागाने व वाळू माफियांनी एकमताने मारलेला डल्ला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांना मलठण येथील कारवाई दरम्यान एकूण किती वन अधिकारी व बंदूकधारी कर्मचारी उपस्थित होते ? याबद्दल माहिती देण्यास नकार दिला व तपास चालू असल्याचे कारण देत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. वन विभागाच्या तोंडी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी वाळू उपसा जोमात चालू झाला आहे.

दरम्यान. या प्रकरणाची वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन घटनेची संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची खाते निहाय चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.