‘आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका’ नवरीच्या आईची आर्त विनवणी

मुलीच्या लग्नाच्या आनंदात केलेला हा व्हिडीओ डोकेदुखी ठरेल, असं आम्हा कुटुंबियांना वाटलंही नाही. कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. उत्साहात तो व्हिडीओ शूट केला, मात्र आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा यांनी केली.

    पुणे: हटके स्टाईलने लग्नात इंट्री करण्याच्या हेतूने स्कॉर्पिओ कारच्या बोनेटवर बसून लग्नाला जाताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या घटनेनंतर नववधूवर गुन्हा दाखल केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर “आनंदाच्या भरात हा व्हिडीओ शूट केला होता, आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा करत आहेत.

    “तिच्या वडिलांचे २००४ मध्येच निधन झाले. तेव्हा ती जेमतेम सहा वर्षांची होती. आईने मोठ्या कष्टाने तिला मोठे केले. तिचे नुकतेच सासवडमध्ये लग्न झाले. आनंदाच्या भरात गाडीच्या बोनेटवर बसून तिने व्हिडीओ शूट केला. अल्पावधीतच तो व्हिडीओ व्हायरल झाला, अगदी बातम्याही झळकल्या. मात्र पोलिस स्थानकात गुन्हाही दाखल झाला. मुलीच्या लग्नाच्या आनंदात केलेला हा व्हिडीओ डोकेदुखी ठरेल, असं आम्हा कुटुंबियांना वाटलंही नाही. कोणालाही त्रास द्यायचा आमचा उद्देश नव्हता. उत्साहात तो व्हिडीओ शूट केला, मात्र आता व्हायरल करु नका” अशी आर्त विनंती मुलीची आई आणि मामा यांनी केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१३ जुलै) तरुणीचा विवाह सासवड (ता. पुरंदर) परिसरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात होता. लग्नासाठी जाताना उत्साहाच्या भरात ती दिवे घाटातून चक्क कारच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास करत होती. या विषयी माहिती मिळताच पोलिस सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास तिथे पोहोचले. त्यावेळी नववधू कारच्या बोनेटवर बसली होती. तर इतर वऱ्हाडी गाडीत बसले होते. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचा कॅमेरा जप्त केला. नववधू, व्हिडीओग्राफर तसेच गाडीतील इतरांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.