संत तुकोबांच्या पादुकांना यंदाचे नीरा स्नान इंद्रायणीत ; इतिहासात  सलग दुसऱ्या वर्षी पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान

'पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'

    देहूगाव: ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ बोला पंढरीनाथ महाराज कि जय, अशा जयघोषात अन् तुतारीच्या वादनात इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये संत तुकारामांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. कोरोनाच्या प्रभावामुळे मोजक्याच वारकरी भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. टाळ, मृदूंग, तुतारीवादन तसेच हरिनामाच्या जयघोषात इंद्रायणीचा परिसर दुमुदूमून गेला होता.

    यावेळी भजनी मंडप ते इंद्रायणी नदीचा घाटा पर्यंत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पालखी व मंदिर, उत्तर दरवाजाला देखील फुलांची सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रभावामुळे शासनाने पायी पालखी सोहळ्याल्या परवानगी न दिल्याने श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका १ जुलैच्या प्रस्थानानंतर येथील भजनी मंडपात ठेवून नित्य पूजापाठ सुरू ठेवण्यात आलेले आहेत.

    पालखी सोहळ्याचा आज १५ वा दिवस असून पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला जातो. यावेळी परंपरेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरा नदीमध्ये स्नाऩ घातले जाते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे यंदाही हे स्नान शक्य झाले नाही. पालखी सोहळ्याच्या इतिहासात हा सलग दुसऱ्या वर्षी पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्थान घालण्यात आले. सकाळी आठ वाजता मंदिरातील भजनी मंडपातून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका साडेसात वाजता संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी डोक्यावर घेतल्या. यावेळी चौघडा, शिंगाडे, वीना व टाळ मृदंगाचा व हरिनामाचा आणि ज्ञानोबा तुकाराम हा मंत्रोच्चार करीत पादुका स्नानासाठी काढण्यात आल्या.

    यावेळी गरुड टक्के, अब्दागिरी भागवत धर्माच्या पताका सेवेकऱ्यांनी खांद्यावर घेतल्या, सराटीचे ग्रामस्थांनी निरानदीचे पाण्याने भरलेला घडा आणला होता. हा घडा घेवून भजन करीत सर्व उपस्थित भाविक इंद्रायणी नदीच्या घाटावर गेले. तेथे प्रथेप्रमाणे दही, दुध, मध, पिठीसाखर, अत्तर व केळी यांच्या पंचामृताने सुभाष टंकसाळे यांनी निरानदीच्या पाण्याने व इंद्रायणी नदीच्या पाण्यामे जलाभिषेक घातला.

    जलाभिषेकानंतर सेवेकऱ्यांनी गरूड टक्के, अब्दागिरी व भागवत धर्माची भगवी पताकांनी देखील नदीमध्ये स्नान घातले. पादुकांच्या खाली नवीन वस्त्र टाकण्यात आले. त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांची आरती घेण्यात आली. या ठिकाणी फळे, पेढे व खडीसाखरेचा महाप्रसाद दाखविण्यात आला. इंद्रायणी तिरावरून पुन्हा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी पुन्हा पादुका डोक्यावर घेतल्या व उपस्थित भाविक भजन गात मंदिरात आले. मंदिराच्या आवारात आल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. मंदिर प्रदक्षिणेनंतर पादुका मंदिरातील भजनी मंडपात स्थिरावल्या.