आंबेगाव तालुक्यातील चेक नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोडेगाव व मंचर पोलीस ठाण्यांच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू आहेत. कोकण भागातील रायगड व ठाणे

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोडेगाव व मंचर पोलीस ठाण्यांच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू आहेत. कोकण भागातील रायगड व ठाणे जिल्हयातून नागरिक चोरटया मार्गाने भिमाशंकर अभयारण्यातून येत होते त्यांना या नाक्यांमुळे आळा बसला असल्याचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.   

घोडेगाव, पालखेवाडी, चिंचोली (को.), तळेघर, डिंभे, तिरपाड, कळंब, पेठ, कारफाटा, शिंगवे फाटा, रोडेवाडी फाटा, लोणी, शिरदाळे आदि ठिकाणी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. या नाक्यांवर बंदोबस्तासाठी वन कर्मचारी, कृषी विभाग, महसूल, पोलीस पाटील, शिक्षण व पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आठ तासांच्या तीन शिफ्ट मध्ये काम करत आहे. इतर तालुक्यातील नागरिक आंबेगाव तालुक्यात येऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. तपासणी नाक्यांवर येणारे नागरिक व वाहनांची सखोल माहिती घेतली जात आहे. नाक्यावर येणा-या वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, चालकाचे नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक, सहप्रवासी संख्या, त्यांची नावे, कोणत्या कारणासाठी बाहेर आला आहात आदि बाबींची माहिती ऑन लाईन पोर्टलवर चौकशी करून भरली जात आहे.  

तपासणी नाक्यांवर काम व्यवस्थित चालू आहे की नाही, हे पाहण्यासाठी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णकांत खराडे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव हे स्वतः पेट्रोलींग करत असून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.