‘आयव्हीएफ’ उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणण्याचा विचार – राजेश टोपे यांचे प्रतिपादन

ग्रामीण भागात डायलिसिस, सिटी स्कॅन, एमआरआय, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यासह गरिबांना आधुनिक उपचार मिळण्यासाठी त्यांना सार्वजनिक आरोग्यसेवेत आणत आहोत. पीपीपी मॉडेलमध्ये रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये उभारले जात आहेत. चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

    पुणे: “ग्रामीण भागात वंध्यत्वाच्या समस्येवर आधुनिक उपचारपद्धती असलेल्या ‘आयव्हीएफ’ अर्थात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा अरगडे हॉस्पिटलचा पुढाकार कौतुकास्पद आहे. येथील आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन करतानाच ‘आयव्हीएफ’सारखे उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षेत आणण्याकरता आरोग्य विभाग प्रयत्न करेल. वंध्यत्वाचा त्रास असणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक दिलासा मिळेल आणि या आधुनिक उपचारांचा लाभ घेता येईल,” असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. ‘ज्ञान, कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा असलेले लोक चांगले काम उभारतात. अरगडे परिवाराकडे या तीनही गोष्टी आहेत. त्यामुळेच चाकणकरांनी त्यांना आपलेसे केले आहे, अशा शब्दात टोपे यांनी अरगडे पिता-पुत्राचे कौतुक केले.

    चाकण येथील अरगडे हॉस्पिटल व प्रसूतिगृह संचालित खेड-जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील पहिल्या नेस्ट आयव्हीएफ सेंटर अर्थात टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या उद्घाटन समारंभावेळी राजेश टोपे बोलत होते. प्रसंगी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते डॉ. रत्नाकर महाजन, माजी आमदार राम कांडगे, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे, अरगडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. असित अरगडे, ऍड. सुप्रिया अरगडे आदी उपस्थित होते.

    यावेळी टोपे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, सिव्हिल सर्जन डॉ. अशोक नांदापूरकर, पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, खेड नगरपरिषद मुख्याधिकारी प्रकाश पाटील, आळंदी आरोग्याधिकारी डॉ. गणपतराव जाधव, चाकण आरोग्य अधिकारी डॉ. नंदा ढवळे, चांडोली आरोग्याधिकारी डॉ. भगवान काकणे, खेड तालुका आरोग्याधिकारी डॉ. बळीराम गाढवे, पत्रकार हरिदास कड, हणमंत देवकर, कल्पेश भोई, गणेश अहेरकर आदींचा सन्मान करण्यात आला.

    राजेश टोपे म्हणाले, “सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याकरता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडुन पाच हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. यातुन ग्रामीण रुग्णालय सक्षम होण्यास मदत होईल. आरोग्य विभागाच्या रिक्त जागा महिन्याभरात भरल्या जातील. चांगल्या आरोग्य सुविधासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रयत्न होताहेत. आधुनिक तंत्रज्ञान, उपचार ग्रामीण स्तरावर पोहोचले पाहिजे. तालुकास्तरावर असे नवतंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात अरगडे यांनी पुढाकार घेऊन वंध्यत्वाची समस्या असलेल्या दाम्पत्याला संततीप्राप्तीचा आनंद देण्याचे त्यांचे काम उल्लेखनीय आहे.”

    “ग्रामीण भागात डायलिसिस, सिटी स्कॅन, एमआरआय, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यासह गरिबांना आधुनिक उपचार मिळण्यासाठी त्यांना सार्वजनिक आरोग्यसेवेत आणत आहोत. पीपीपी मॉडेलमध्ये रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये उभारले जात आहेत. चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी दिली जात आहे. नवीन ऍम्ब्युलन्स प्रस्तावित आहेत. कोरोना काळातील अनुभव लक्षात घेऊन अनेक बदल होत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने सार्वजनिक आरोग्य विभाग कात टाकत आहे,” असे टोपे यांनी नमूद केले.

    “उपचारासाठी आता पिंपरी-चिंचवड, पुण्यात जाण्याची गरज भासणार नाही. या भागातील रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार आता इथेच उपलब्ध होतील. वंध्यत्वासारख्या समस्येवर उपचार उपलब्ध झाल्याने येथील रुग्णांची परवड होणार नाही. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी अरगडे पिता-पुत्र डॉक्टरांचा आदर्श घ्यावा. लोकांना परवडेल अशा स्वरूपात ही सेवा उपलब्ध करून द्यावी.”दिलीप मोहिते पाटील  ,

    डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले, “नीतिमूल्यांची जपणूक करत अरगडे पिता-पुत्रांनी वैद्यकीय सेवा दिली आहे. चाकणसारख्या निमशहरी भागात अशी सेवा देणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यापुढील काळात अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच शिक्षण आणि आरोग्य यावर काम होणे गरजेचे आहे. सार्वजनिक खर्चातून चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.”

    राम कांडगे म्हणाले, “चाकणकरांना वैद्यकीय सेवा देण्याची परंपरा असित अरगडे यांनी अविनाश यांच्यानंतर कायम सुरू ठेवली, याचा अभिमान वाटतो. अनेकांचे फॅमिली डॉक्टर असलेले हे डॉक्टर आहेत. चाकणमध्ये खासगी व सरकारी क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नातून वैद्यकीय महाविद्यालय उभारावे. त्यासाठी दिलीप मोहिते पाटील यांनी पुढाकार घ्यावा.

    डॉ. असित अरगडे म्हणाले, “गेल्या १५ वर्षात ३५०० वंध्यत्व उपचार व सुमारे ७००० यशस्वी प्रसूती केल्यानंतर वंध्यत्व उपचारांतील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या टेस्ट ट्यूब बेबीची सुविधा या भागात उपलब्ध करून दिली जात आहे. ४५ वर्षांची सामाजिक भावनेतून केलेल्या वैद्यकीय सेवेची परंपरा असलेल्या अरगडे हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहात आता वंध्यत्व सल्ला आणि ओपीडीसह सर्व सोयींनी युक्त असे आयव्हीएफ सेंटर सेवा व उपचार देणार आहे. माफक दरात हे उपचार उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
    अरगडे आयव्हीएफ सेंटरची वैशिष्ट्ये :
    – तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स
    – गोपनीयतेच्या नियमांचे पालन
    – उपचारांतील संपूर्ण पारदर्शकता
    – अत्याधुनिक यंत्रसामुग्री
    – दर्जेदार निर्जंतुकीकरण यंत्रणा
    – उपयोजित उपचारांची उपलब्धता

    आयव्हीएफ सेंटर कोणासाठी?
    – गर्भधारणा होण्यात अडचण
    – बीजवाहिन्या नसल्यास किंवा बंद पडल्यास
    – अनियमित मासिक पाळी
    – गर्भाशयात सूज किंवा शुक्राणूंमध्ये दोष
    – आययुआय/आयव्हीएफ निकामी झाल्यास
    – दुसरी संतती होत नसल्यास