२० लाखांचा दरोडा टाकून बिहारला पळून जात असलेल्या तिघांना नाशिक मधून अटक

ट्रकमधून २० लाख रुपयांचे ऑटोमोबाईल पार्ट जबरदस्तीने काढल्याचा प्रकार नुकताच खेड तालुक्यातील कुरुळी ते महाळुंगे या मार्गावर घडला. यातील तीन दरोडेखोरांना पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे

    पिंपरी: ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाच्या अंगावर चादर टाकून चालकाला दाबून ठेवले. त्यानंतर ट्रक चालवत नेऊन ट्रकमधून २० लाख रुपयांचे ऑटोमोबाईल पार्ट जबरदस्तीने काढल्याचा प्रकार नुकताच खेड तालुक्यातील कुरुळी ते महाळुंगे या मार्गावर घडला. यातील तीन दरोडेखोरांना पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. हे आरोपी नाशिक येथून बिहारला पळून जात होते. तर त्यांच्या पाच साथीदारांचा शोध सुरु आहे.

    रणजितकुमार रामसेवक दास (वय ३२, रा. बथनाह, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), सुशील रामअवतार कामत (वय ३६, रा. कुनौली बजार, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), शैलेंद्रकुमार शिवलखन मंडल (वय ३२, रा. कोईलाडी तैलाठी, हनुमान नगर, जि. सप्तरी, नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. रवी सुभाष चंदनशिवे (वय ४७, रा. वाघोली) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    फिर्यादी चंदनशिवे हे ट्रक चालक रात्री ते त्यांच्या ट्रकमध्ये कुरुळी येथे झोपले होते. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दरोडेखोर आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून ट्रकची चावी घेतली. फिर्यादी यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना दाबून ठेवले. ट्रक चालू करून तो महाळुंगे पर्यंत चालवत नेला. त्यानंतर आरोपींनी गाडीतील १९ लाख ९९ हजार ४०५रुपये किमतीचे सब असेम्ब्ली मोटार युनिटस्टार्टर (ऑटोमोबाईल पार्ट) दुस-या गाडीत काढून घेतले.

    याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी दोन पथके तयार केली. दरम्यान, हे दरोडेखोर नाशिकमार्गे बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार म्हाळुंगे पोलिसांनी नाशिकला धाव घेतली. नाशिक पोलीस, नाशिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने १२ तास रेल्वे स्थानकावर सापळा लावण्यात आला. पोलिसांची नजर चुकवून आरोपी रेल्वेत बसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यात तिघेजण पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींकडून १९ लाख ९९ हजार४०५रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.