अल्पवयीन कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, प्रथम दर्शनी एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचे दिसत आहे. चार आरोपीना अटक केली आहे. हा गुन्हा फास्ट्रॅकवर घेत लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणार.

  पुणे : पुण्यातील बिबवेवाडीत एकतर्फी प्रेमातून सराव करण्यास मैदानावर आलेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला मध्यरात्री अटक केली. तर त्याच्या तीन साथीदाराना ताब्यात घेतले आहे. ती उत्तम कबडीपट्टू होती. तिच्या हत्येने शहर हादरून गेले असून, सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.

  याप्रकरणी ऋषिकेश ऊर्फ शुभम बाजीराव भागवत (वय २१, रा. सुखसागर नगर, सध्या रा. चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर तीन १७ वर्षीय मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४, रा. बिबवेवाडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे.

  ऋषिकेश हा तिच्या नात्यातील आहे. काही वर्षांपूर्वी ते एकमेकांच्या शेजारी राहत होते. ऋषीकेश हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तिची छेड काढली होती. त्यावेळी दोन्ही कुटुंबाने त्याला समज दिली होती. तर त्याला चिंचवड येथील नातेवाईकांकडे राहण्यास पाठवले होते. तो तेथेच राहत होता. त्यानंतरही तो क्षितीजा हिचा पाठलाग करत असावा, असा संशय पोलिसांना आहे.

  दरम्यान, मंगळवारी सायंकाळी क्षितिजा तिच्या इतर चार मैत्रिणीसोबत यश लॉन्स परिसरातील मैदानावर सराव करण्यास गेली होती. दरम्यान परिसरात मुले खेळण्यास देखील येतात. तर जेष्ठ नागरिक व्यायाम करण्यास येत असतात. सायंकाळी साडे पाच ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी ऋषीकेश आणि त्याचे दोन मित्र दुचाकीवरून येथे आले. त्यावेळी सरावापूर्वी वार्मअप करत असलेल्या क्षितिजा हिला बाजूला बोलवून घेतले. त्यांच्यात बोलने सुरू झाल्यानंतर वाद झाले आणि यातच त्याने सुरा काढून तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी गोंधळ झाल्यानंतर इतर मुलींना या आरोपींनी धाक दाखवत तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे मुली घाबरून गेल्या. त्यांना घाबरवण्यासाठी आरोपींनी बनावट पिस्तुल आणले होते. ते दाखवून त्यांनी या मुलींना येथून पळवून लावले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या क्षितिजाच्या गळ्यावर त्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. ती खाली निपचित पडल्यानंतर देखील त्याने वार करून तिचे धड वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मोठा गोंधळ उडल्याने आरोपी तेथेच हत्यारे टाकून पसार झाली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बिबवेवाडी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी रात्रभर शोध घेत या आरोपींना पकडले आहे.

  शस्त्रसाठाच मिळाला…

  ऋषीकेश आणि त्याचे साथीदार हे पूर्ण तयारी करून आले होते. दोन बॅगेत त्यांनी हत्यारे आणली होती. त्यामुळे त्यांनी येथील रेकी करून गेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या बॅगेतून दोन तलवारी, कोयता, सुरू, मिरची पूड, बनावट पिस्तुल यासह हत्यारे मिळाली होती. त्यामुळे ते पूर्ण प्लॅन करून आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  तिने धाडस केले होते…

  क्षितीजासोबत सराव करण्यासाठी चार मैत्रिणी होत्या. आरोपी दुचाकीवरून आल्यानंतर त्यांनी क्षितिजाला बाजूला बोलवून घेतले. त्यावेळी तिचे एक मैत्रीण देखील तिच्यासोबतच थांबली. ऋषीकेशने अचानक सुरू काढून वार करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन वार केल्यानंतर त्या मैत्रिणीने त्याचा हात पकडत सुरा धरला व त्याला विरोध केला. मात्र आरोपींनी हिरकणीला बनावट पिस्तुल दाखवून धाक दाखवत तुलाही मारू अशी धमकी दिली. त्यामुळे तिने सुरा सोडला आणि बाजूला झाली. त्यानंतर तिच्यावर आरोपींनी सपासप वार केले आणि तिची निर्घृण हत्या केली.

  गुन्हा फास्ट्रॅकवर घेत लवकर चार्जशीट दाखल करणार

  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बोलताना सांगितले की, प्रथम दर्शनी एकतर्फी प्रेमातून घटना घडल्याचे दिसत आहे. चार आरोपीना अटक केली आहे. हा गुन्हा फास्ट्रॅकवर घेत लवकरात लवकर चार्जशीट दाखल करणार.