वढू बुद्रुकमध्ये तिघा चोरट्यांचा धुमाकूळ

तीन ठिकाणी चोरीचा चोरट्यांचा प्रयत्न
शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील वखारीचा मळा परिसरात रात्रीच्या सुमारास तीन चोरट्यांनी धुमाकूळ करून घरांवर दगडफेक करत एका घरातील दहा हजार रुपये लंपास करत एका युवकाला दगडाने जखमी केले असल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तीन युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील वखारीचा मळा येथील संदीप शिवले हे सहा ऑक्टोबर रोजी रात्री घरात झोपलेले असताना त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजविला म्हून त्यांनी आरडाओरडा केला यावेळी संदीप यांच्या घरासमोरून तीन युवक पळून जाताना शेजारील नवनाथ शिवले याने पाहिले, त्यांनतर सर्वजण शेजारील झोपले असताना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास संदीप शिवले यांच्या घराचा दरवाजा तुटल्याचा आवाज आला त्यामुळे शिवले यांनी शिक्रापूर पोलिसांना फोन करून याबाबत कळविले. पोलीस आल्यानंतर शिवले यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील कपाट पडलेले तसेच सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि दहा हजार रुपये चोरी गेले असल्याचे निदर्शनास आले यावेळी शेजारी राहणाऱ्या दत्ता शिवले यांच्या दरवाजाची कडी तोडून घरातील दुचाकी चोरट्यांनी बाहेर आणून टाकल्याचे दिसून आले. तसेच त्या ठिकाणहून काही अंतरावर राहणाऱ्या नितीन शिवले यांच्या घरावर देखील चोरट्यांनी दगडफेक केल्याने यामध्ये नितीन शिवले हा युवक जखमी झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबत संदीप तानाजी शिवले रा. वढू बुद्रुक (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुनाजी जाधव हे करत आहेत.