पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथे तीन वाहनांचा भीषण अपघात; एक ठार तीन गंभीर जखमी

कुरकुंभ औद्योगीक वसाहतील एका कंपनीच्या कामगारांची बस, मालवाहतूक टेम्पो व मालवाहतुक ट्रक या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंपनीतील कामगार योगेश मुसमाडे हा जागीच ठार झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

    पाटस: पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथे कुरकुंभ औद्योगीक वसाहतील एका कंपनीच्या कामगारांची बस, मालवाहतूक टेम्पो व मालवाहतुक ट्रक या तीन वाहनांचा  षण अपघात झाला.या अपघातामध्ये औद्योगीक वसाहतील कंपनीमधील एक कामगार जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाली आहेत.

    योगेश भास्कर मुसमाडे ( वय ४० रा.मांजरी पुणे ) हा जागीच ठार झाला तर ओमप्रकाश चव्हाण ( वय ५५ रा.हडपसर ),हिमेश चव्हाण (वय ४५रा.पुणे ) , मनोहर बंडगर (वय ४२ रा.दौंड ) हे तीघे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी सहा सव्वा वाजण्याच्या सुमारास हॅाटेल शिवनेरी जवळ आंनदेश्वर कडेजाणारा रस्ताजवळ हा अपघात झाला. कुरकुंभ औद्योगीक वसाहतीमधील एमक्युर कंपनीची बस (क्रमांक एम.एच १४, जी.यु १७१५) ही पंधरा कामगारांना घेवून पुणे बाजूकडे जात असताना पाटस घाटात मालवाहतुक करणारा टेम्पो (क्रमांक एम.एच.१३, आर. ७४९७) या वाहनांची ओवरटेक केल्याने चालु गाडीमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याची घटना घडली.कंपनीच्या बसने घाटच्या पुढे एक किलोमिटर अंतर पुढे जावून पाठीमागून येणाऱ्या टेम्पोला महामार्गावरच थांबवून वाहनचालक आणि बसमधील काही कामगार उतरून पु्न्हा बाचाबाची करू लागले. यावेळी पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकने (क्रमांक एम.एच.१२ एम.व्ही ५५९७ ) टेम्पो आणि बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कंपनीतील कामगार योगेश मुसमाडे हा जागीच ठार झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,दशरथ कोळेकर,हनुमंत खडके,पोलीस मित्र सोनबा देशमुख, बारामती फाटा वाहतुक पोलीस आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील मालवाहतूक ट्रक वाहनचालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे,अशी माहिती पोलीसांनी दिली.