शिक्रापूरसह परिसरात रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

शासनाकडून काही मदत मिळावी या अपेक्षेमध्ये रिक्षाचालक शिक्रापूर : देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिलेले असताना अनेक दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले असताना सर्वच व्यवसायांना त्याचा मोठा फटका बसला असताना

शासनाकडून काही मदत मिळावी या अपेक्षेमध्ये रिक्षाचालक

शिक्रापूर : देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिलेले असताना अनेक दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आले असताना सर्वच व्यवसायांना त्याचा मोठा फटका बसला असताना हातावर पोट असणारे रिक्षा चालक भीषण संकटात सापडले असून रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शिक्रापूर ता. शिरूर सह परिसरात जवळपास दीडशेहून अधिक परवानाधारक रिक्षा चालक असून रोजगाराची संधी उपलब्ध होईल म्हणून अनेक रिक्षा चालकांनी शासकीय रिक्षा परवाना मिळवीत, कर्ज काढून तसेच घरातील दागदागीने गहाण ठेवून भांडवल उपलब्ध करून रिक्षा खरेदी केलेल्या आहेत, अनेक युवकांनी खासगी बँकेतून कर्ज मिळवून रिक्षा खरेदी केली आहे, त्यांनतर परिसरातील कंपन्या, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी नागरिकांची ने आन करत मिळणाऱ्या चार दोन रुपयांमधून हे रिक्षा चालक आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असताना अचानक देशभरात कोरोना सारखे भीषण संकट उभे राहिले आणि सर्वत्र लॉकडाऊन करण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र रिक्षा चालकांकडे असलेल्या थोड्याफार पैशातून कुटुंब चालत असताना दोनतीन वेळा लॉकडाऊन वाढविण्यात आले आणि रिक्षा चालकांच्या डोळ्यासमोर मोठे संकट दिसू लागले, त्यांनतर दोन महिने लॉक डाऊन राहिल्यामुळे पहिलेच बँकेचे कर्ज असताना पुन्हा नव्याने पैसे अथवा कर्ज मिळविणे अशक्य होऊ लागले त्यामुळे रिक्षाचालक अजूनही संकटात सापडले, सध्या काही प्रमाणात लॉकडाऊन उघडले आहे मात्र रिक्षा चालकांना वाहतुकीची परवानगी मिळाली नाही, त्यात खासगी बँकांचे कर्जाचा हप्ता भरणा करण्यासाठी फोन येऊ लागले असल्याने रिक्षा चालक हवालदिल झाले आहे, तसेच आता थोड्याच दिवसात शाळा सुरु झाल्यानंतर मुलांच्या शाळेचा खर्च कसा करायचा असा प्रश्न रिक्षा चालकांना पडला असून परवाना धारक रिक्षा चालकांना शासनाने काही मदत करावी अशी अपेक्षा रिक्षा चालक करू लागले आहे.

सरकारने आमच्यासाठी काही तरी करावे 

आम्ही कर्ज काढून रिक्षा खरेदी केल्या त्यांनतर कसाबसा आमचा प्रपंच चालू असताना लॉकडाऊन झाले, त्यामुळे आम्हाला रिक्षा घरी उभ्या ठेवाव्या लागल्या, सध्या बँकांचे हप्ता भरण्यासाठी फोन येत आहे, आता खायलाच नाही मग हप्ता भरायचा कोठून, थोड्या दिवसात शाळा सुरु होतील मग काय करायचे अशी चिंता आम्हाला पडली असून सरकारने रिक्षा चालकांसाठी काहीतरी करावे असे रिक्षा चालक जावेद पठाण यांनी सांगितले.