लस संपल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ

महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ. वर्षा डांगे यांना कोरोना लसीचे किती डोस उपलब्ध आहेत, उपलब्ध साठा किती दिवस पुरेल, किती लसीकरण केंद्र बंद केलीत, याविषयी माहिती मागितली. त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

  पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या मध्यवर्ती वायसीएम भांडार विभागात एकही डोस शिल्लक नाही. शासनाकडे दररोज एक लाख लसीची मागणी करुनही मिळत नसल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे अनेकाना लस उपलब्ध नसल्याचे सांगून लस न देताच परत पाठविले जात आहे. तसेच लस नसल्याने काही लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यास वैद्यकीय विभागातून टाळाटाळ होत आहे.

  कोविड -१९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण कार्यक्रम सुरु आहे. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नोंदणी कृत आरोग्य सेवा देणारे व फ्रंन्ट लाईन वर्कर आणि ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. महानगरपालिकेने ५८ आणि २९ खाजगी लसीकरण केंद्रावर आजअखेर दोन लाख आठ हजार सातशे पंच्यानव नागरीकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.

  दरम्यान, संपूर्ण राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. महानगरपालिका हद्दीत लसीकरण केंद्रावरही लसीचा तुटवडा जाणवत आहे. बुधवारी (दि.7) मध्यवर्ती भांडार विभागातील लस संपली आहे. त्यामुळे गुरुवारी आज (दि.८) दिवसभरात बहुतांश लसीकरण केंद्राकडे उपलब्ध असलेल्या कोविड-१९ लसीकरण सुरू आहे. तर काही केंद्रांना महापालिकेकडून लसच मिळाली नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कोशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लसी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. याबाबत राज्य शासनाकडून काहीच माहिती मिळाली नसल्याचे संबंधित कर्मचा-याने सांगितले.

  याबाबत महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ. वर्षा डांगे यांना कोरोना लसीचे किती डोस उपलब्ध आहेत, उपलब्ध साठा किती दिवस पुरेल, किती लसीकरण केंद्र बंद केलीत, याविषयी माहिती मागितली. त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

  दुसऱ्या डोससाठी अकरा हजार शिल्लक
  राज्य शासनाकडे कोशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसीची एक लाख मागणी केलेली आहे. परंतू, त्यातील 25 ते 30 हजार डोस महापालिकेच्या वाट्याला येत आहेत. हे डोस पहिल्यांदा डोस घेणाऱ्या व्यक्तीला की ज्याचा दुसरा डोस शिल्लक आहे त्यांना द्यायचा, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. “कोवॅक्‍सिन’ आणि “कोविशिल्ड’ च्या तत्काळ उपलब्ध न झाल्यास शहरातील काही लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ वैद्यकीय विभागावर आली आहे. परंतू, दुसरा डोस घेणा-यासाठी अकरा हजार एकशे एक लस लसीकरण केंद्रांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदा लस घेणा-यांना लस उपलब्ध होण्याची वाट पाहावी लागत आहे.