तोतया इन्टेलिजन्स ब्युरो अधिकारी जेरबंद; पिंपरी पोलिसांची कारवाई

पोलिस अधिकाऱ्यांच्नी पुण्यातील आय. बी. कार्यालयात सखोल चौकशी केली असता आरोपी भावसार हा अधिकारी असल्याचे भासवत असून खोटे ओळखपत्र तयार करून वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी भावसार याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या मोबाईलमधील आय. बी. इन्टेलिजन्स ब्युरोचे ओळखपत्र खोटे व बनावट असल्याची कबुली त्याने दिली.

    पिंपरी: नाकाबंदीवरील पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे तोतया इन्टेलिजन्स ब्युरो अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हा प्रकार आकुर्डी रेल्वे स्टेशन चौक येथे घडला. प्रतिक सुनील भावसार वय (वय २५, विशालनगर, वाकड) असे तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात निगडी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
    दुचाकीवरुन विनामास्क आलेल्या आरोपी भावसार याला पोलिस कर्मचारी सोपान बोधवड यांनी दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावर त्याने मी आय. बी. दिल्ली (इन्टेलिजन्स ब्युरो) अधिकारी असून मला सोडा, असे सांगितले. त्यावर बोधवड यांनी ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता आम्हाला आमची ओळख दाखविण्यास मनाई असल्याचे तो म्हणाला. त्यानंतर तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून तुमच्या नेमणुकीबाबत खात्री करून द्या, असे बोधवड म्हणाले असता, मी सुटीवर असल्याने फोन करू शकत नाही, ते माझ्यावर कारवाई करतील, असे भावसार याने उत्तर दिले.
    यावरून संशय बळावल्याने पोलिस कर्मचारी बोधवड यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्नी पुण्यातील आय. बी. कार्यालयात सखोल चौकशी केली असता आरोपी भावसार हा अधिकारी असल्याचे भासवत असून खोटे ओळखपत्र तयार करून वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी आरोपी भावसार याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या मोबाईलमधील आय. बी. इन्टेलिजन्स ब्युरोचे ओळखपत्र खोटे व बनावट असल्याची कबुली त्याने दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.