गड-किल्ल्यांचा करणार पर्यटनपूरक विकास ; पहिल्या टप्प्यात ‘या’ सहा किल्ल्यांचे संवर्धन करणार

-मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

  पुणे : राज्‍यातील गड-किल्ले संवर्धन आणि विकासातून परिसराचा पर्यटनपूरक विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २४ सदस्यांची सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत. या समितीद्वारे पहिल्या टप्प्यात सहा किल्ल्यांचा संवर्धन आणि विकास केला जाणार आहे.

  मुख्यमंत्री ठाकरे यांनी १६ मे आणि १३ जून रोजी दुर्गप्रेमी प्रतिनिधींसमवेत एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यानी राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे, तसेच किल्ल्यासभोवतालच्या परिसरात पर्यटकांसाठी सुविधा पुरविणे, याचबरोबर जैवविविधता जपण्याच्या सूचना दिल्या होत्या. या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सुकाणू समिती गठीत करण्यात आली असून, मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षामार्फत सुकाणू समितीद्वारे घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे व पाठपुरावा करणे या बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

  -अशी आहे समिती
  समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार उपाध्यक्ष असणार आहेत. तर महसूल, सांस्कृतिक, पर्यटन, वनमंत्री यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती विशेष आमंत्रित सदस्य असणार आहेत. तर विविध खात्यांचे सचिव सदस्य असणार आहेत. तसेच आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी, ऋषिकेश यादव, माधव फडके, उमेश झिरपे, नितीन बानुगडे पाटील आमंत्रित सदस्य आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव समितीचे सदस्य सचिव आहेत.

  -या किल्ल्यांचे होणारे संवर्धन
  या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, तोरणा (जि. पुणे) विजयदुर्ग, सिंधुदुर्ग (जि. सिंधुदुर्ग), सुधागड (जि. रायगड) या सहा किल्ल्यांच्या सर्वांगिण संवर्धन आणि विकासासाठी मान्यता देण्यात आली आहे.

  -ऐतिहासिक आणि सांस्कृतीचा होणार विकास
  गडकिल्ल्यांच्या आजूबाजूला असलेल्या ५० कि.मी. परिघातील असलेली पर्यटनस्थळे, साहसी खेळ, गिर्यारोहण, किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ, तिथे घडलेला पराक्रम, परिसरातील वन्यजीव, वनसंपदा, जैवविविधता जोपासत, परिसरातील लोककला, परंपरेचे संवर्धन केले जाणार आहे. तसेच गडाच्या अनुषंगाने काही लढाया झाल्या असतील तर त्या, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे.

  अशी असणार विभागनिहाय कामे
  – सांस्कृतिक व पुरातत्व विभाग – किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन.
  – पर्यटन विभाग – परिसरात पर्यटन केंद्र उभारणी.
  – वन विभाग – गडकिल्ले हरितीकरण आणि जैवविविधता संवर्धन
  – सार्वजनिक बांधकाम विभाग – पर्यटनस्थळांकडे पोहच रस्ते करणे.
  – माहिती व जनसंपर्क संचालनालनालय – किल्ले संवर्धन उपक्रमाचा प्रचार आणि प्रसिध्दी.

  -‘सह्याद्री‘ ची मागणी स्विकारली
  शिवनेरी पॅटर्ननुसार राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती अथवा महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेद्वारे २००७ पासून राज्य सरकारकडे होत आहे. या मागणीचा मसुदा १२ फेब्रुवारी २०२० संस्थेने मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला होता. तर नुकत्याच १३ जूनच्या बैठकीत देखील संस्था प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केल्याबद्दल संस्थेने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.