कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत विषारी सांडपाणी रस्त्यावर ; सम्राट पेपर मिल  कंपनीचा महाप्रताप

प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतमधील सम्राट पेपर मिल या कंपनीने  दूषित सांडपाणी उघड्यावर सोडून दिल्याने वाहून आलेले  सांडपाणी  शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याचा प्रकार घडलाय . मागील काही दिवसांपासून  येथील शेतकरी , नागरिक या दूषित केमिकल युक्त काळ्या सांडपाण्याबाबत  हार्मोनि ऑर्गनिक्स या कंपनीला लक्ष्य  करत होते  परंतु  सम्राट पेपर कंपनीच्या आवाराची पाहणी केली असता हे दूषित काळसर पाणी सम्राट पेपर मिल कंपनीचे असल्याचे उघडकीस आले आहे.   

सम्राट पेपर मिल ( गोदावरी ) ही कंपनी अनेक वर्षांपासून हे दूषित पाणी उघड्यावर सोडत असून हे दूषित सांडपाणी येथील जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीत जात असल्याची तक्रार येथील शेतकरी करीत आहे.नोव्हेंबर  २०१९ रोजी  याच सम्राट पेपर मिल ( गोदावरी ) कंपनीकडून  सांडपाणी कंपनीच्या ईटीपी मधून  थेट कंपनीत असणाऱ्या शेत तळ्यात सोडले जात होते. परंतु येथील पांढरेवाडी ग्रामपंचायत व शेतकरी  यांनी संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळाला  पत्रव्यवहार करून या कंपनीवर कारवाई करण्याची मांगणी केली होती. परंतु हेच दूषित पाणी अजूनपर्यंत  या शेतकऱ्यांच्या शेतात येत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीवर काय कारवाई केली असा सवाल येथील शेतकरी,नागरिक करत आहे.या दूषित सांडपाण्यामुळे या परिसरातील हजारो एकर शेती बाधित झाल्या आहेत आणि यावर काही तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात अजून शेती बाधित होऊ शकते.

 संबंधित सम्राट पेपर मिल कंपनीकडून  शासकीय आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसविले जात असल्याची तक्रार शेतकरी व स्थानिक नागरिकांनी पुण्यातील  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाकडे केली असून अद्यापर्यंत  नागरिकांच्या समस्यांची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने. कंपनीचे प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांशी  काही लागेबंध तर नाहीत ना अशी  चर्चा  शेतकरी व नागरिक करत आहे.

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला असता कंपनीच्या प्रदूषणा संदर्भात लेखी तक्रार आल्याशिवाय  कारवाई करत नाही असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी  सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले.