इंदापूरात बसच्या धडकेने  व्यापार्‍याचा मृृत्यू

इंदापूर :  इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाका, इंगुले मैदानावर थांबलेल्या मोटारसायकलस्वाराला बसने धडक दिल्याने इंदापूरातील प्रसिद्ध केळी आडत व्यापार्‍याचा जागीच मृृत्यु झाला. घटनेनंतर  बस ड्रायव्हर अपघातग्रस्त वाहनासह फरार झाला आहे.  याबाबतची माहिती अस्लम याकुब चौधरी (वय ३८) रा. श्रीराम चौक(इंदापूर) यानीं इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. जावेद नाजऊद्दीन बागवान (वय ४०) रा. टेंभुर्णी नाका इंदापूर असे अपघातात मयत झालेल्या केळी आडत व्यापार्‍याचे नाव आहे. सोमवारी (दि.१०) रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास  इंदापूरातील इंगुले मैदान येथील मोकळ्या मैदानात दररोज भरणार्‍या भाजीपाला विक्री मंडईमध्ये केळी विक्रीसाठी गाडा लावून नाजऊद्दीन हे इतर सामान आणण्यासाठी त्यांच्या युनीकाॅन कंपनीची एम. एच. १२, बी. के. ०११८  मोटरसायकलवरून मैदाना शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेले होते.  ते परत येताना मैदानावर थांबले असता जुना शहा रोडवरून आलेल्या पांढर्‍या रंगाच्या बसने त्यांच्या  मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली जमीनीवर पडले.  बसचे पाठीमागचे चाक त्यांच्या  डोक्यावरून गेल्याने ते जागीच मयत झाले. अपघातग्रस्त बस ड्रायव्हरने अपघातानंतर  बस जागेवर न थांबवता  तसाच निघून  गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.