पुणे-सातारा महामार्गावर शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग

सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही
भोर: पुणे- सातारा महामार्गावर चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला. प्रवास करणाऱ्या आणि स्थानिक तरुणाच्या मदतीने पोलिसांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रौद्ररूप धारण केलेल्या आगीच्या तांडवात ट्रक जळून खाक झाला आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. इंजिन गरम अथवा शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकला आग लागल्याचे अंदाज वर्तविले जात आहे.
-अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल
पुणे- सातारा महा मार्गावरील सारोळा (ता.भोर) येथे ट्रकने पेट घेतल्याची घटना रविवारी (दि.११) रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्गावरून (एमएच ०४ ईएल ८६४१) हा ट्रक कागदाच्या पुठ्ठेच्या वाहतूक करत होता. अचानक चालत्या ट्रकचे इंजिनमधून ओईलची गळती होऊ लागल्याने चालक अमरनाथ पाल याने प्रसंगावधान ओळखून ट्रक सेवा रस्त्यावर घेतला. यामुळे मोठा अनर्थ टळला असून ट्रकला आग लागल्याने सातारा बाजूला काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. दोनच्या सुमारास अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पेटलेला ट्रक विझविण्यात आला.
किकवी दूरक्षेत्राचे राजगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निखील मगदूम, हवालदार अनिता रवळेकर, अमीर शेख, संतोष दावलकर, योगेश राजीवडे घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली. यावेळी पोलिसांनी ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी प्रवासी तरुण आणि स्थानिकांच्या मदतीने प्रयन्त केला. मात्र आगीने अधिक पेट घेतला. यावेळी शिरवळ, भोर नगरपालिका कात्रज येथून आलेल्या अग्निशामक दलाच्या पथकांनी संपूर्ण पेटलेला ट्रक विझविण्यात आली. महामार्गावर खांद्याचे साम्राज्य आणि रखडलेल्या रुंदीकरणामुळे रोजच प्रवाशांना सामना करावा लागत आहे.