शिक्रापुरात एकाच दिवशी चोवीस कोरोनाबाधित रुग्ण  आढळले

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरणाबाधित रुग्ण आढळून येत असताना एका दिवसाच्या विश्रांती नंतर आता आज पुन्हा शिक्रापुरात अकरा, तळेगाव ढमढेरेत सात, धानोरेत दोन, कोरेगाव भीमात तीन तर सणसवाडीत एक असे तब्बल चोवीस कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी आढळून आले असून त्यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

-नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी
शिक्रापूर (ता. शिरूर) सह आजूबाजूच्या आदी गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या सोसायटीमध्ये दररोज नियमितपणे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना यापूर्वी काही कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यू देखील झाला आहे. दहा ऑगस्ट रोजी शिरूर तालुक्यातील रुग्ण संख्या एक अक्षरी अंकाने वाढल्याने तालुक्याला मोठा दिलासा मिळाला होता मात्र आज कोरोना बाधितांच्या संखेने अचानक डोके वर काढले आहे. शिक्रापूर येथे तब्बल अकरा कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत एकाच घरातील सहा व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे, तर शिक्रापूर बरोबर तळेगाव ढमढेरेत सात, धानोरेत दोन, कोरेगाव भीमात तीन तर सणसवाडीत एक असे तब्बल चोवीस कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. सदर परिसरातील कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ यांच्या सह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केले असून सर्व कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे. तर शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले आहेत, तर नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.