गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना वडगावात अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वडगाव माळीनगर परिसरात मदन वारींगे व सागर भिलारे संशयितरित्या दिसत असताना या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

    वडगाव मावळ : स्थानिक गुन्हे शाखेकडून वडगाव मावळमध्ये (Vadgaon Maval Crime) गावठी पिस्तुलसह दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. मदन तुळशीराम वारींगे (वय ३१ रा. माळीनगर, वडगाव ता. मावळ) व सागर दिलीप भिलारे (वय ३१ रा. भिलारेवाडी, वडगाव ता. मावळ) अशी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वडगाव येथील माळीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

    याबाबत पोलीस कर्मचारी अक्षय नवले यांनी फिर्याद दिली आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. वडगाव येथील माळीनगर परिसरात अवैध गावठी पिस्टलसह मदन तुळशीराम वारींगे (३१) व सागर दिलीप भिलारे या दोघांना ताब्यात घेतले.

    याबाबत वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे इसम यांची गोपनीय माहिती काढून अवैद्य शस्त्रांबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी अशा प्रकारचे अवैध शस्त्रास्त्र खरेदी-विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याबाबत पथकांना सूचना दिल्या होत्या.

    स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वडगाव मावळ परिसरात गस्त करीत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. वडगाव माळीनगर परिसरात मदन वारींगे व सागर भिलारे संशयितरित्या दिसत असताना या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी मदन वारींगे याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस मिळून आले. वरील इसमांच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल आणि आणि दोन जिवंत काडतुस आणि इतर मिळून एकूण ८१,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

    ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी कंधारे, दीपक तापकीर, दीपक साबळे, मुकुंद आयचित, संदीप वारे, अक्षय नवले, प्रदीप सुपेकर, प्रसन्ना घाडगे, प्राण येवले, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वडगाव मावळ पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई करीत आहेत.