कोरोना चाचणीचे बनावट अहवाल देणाऱ्या दोघांना अटक

दोन्ही आरोपींनी ते नमूने कृष्णा डायगनोस्टिक लॅबकडे न देता जुन्या रिपोर्टमध्ये छेडछाड करुन त्यावर डिजिटल सही आणि शिक्के मारले. आरटीपीसीआर चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊन त्यांनी कामगारांची फसवणूक केली.

    पिंपरी: कोरोनासाठी केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ९ ते १६ एप्रिल दरम्यान म्हाळुंगे, भांबोली (ता. खेड) याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. बिरुदेव नानासाहेब वाघमोडे (वय २२, रा. जाधववाडी, चिखली) व बळीराम बापू लोंढे (वय २४, रा. शरदनगर, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सुजित विजय वायकर (वय ३८, रा. चऱ्होली, ता. हवेली ) यांनी शुक्रवारी (दि.३०) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरुदेव वाघमोडे आणि बळीराम लोंढे हे आरोपी हे चिखलीतील समर्थ लॅबमध्ये काम करतात. तर, फिर्यादी सुजित वायकर हे इम्प्रेशन्स सर्व्हिसेस कंपनीत कामाला असून त्यांच्या कंपनीतील ६२ कामगारांचे कोरोना नमूने तपासणीसाठी आरोपींकडे देण्यात आले. होते. दोन्ही आरोपींनी ते नमूने कृष्णा डायगनोस्टिक लॅबकडे न देता जुन्या रिपोर्टमध्ये छेडछाड करुन त्यावर डिजिटल सही आणि शिक्के मारले. आरटीपीसीआर चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊन त्यांनी कामगारांची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.