कंपनीतून केबल चोरीप्रकरणी दोघांना अटक

    बारामती : बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या आवारातून केबल चोरून नेल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू सलिम गायकवाड (वय २४, रा. प्रबुद्धनगर, आमराई) व संग्राम उर्फ झिंगाट हनुमंत साळुंखे (वय २०, रा. आमराई) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    याबाबत सचिन भिका गिरनारे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी हे औरंगाबादच्या तोशिवा सोलार प्रा. लि. कंपनीत काम करतात. बारामती एमआयडीसीतील वरसा प्लास्टिक प्रा. लि. कंपनीच्या छतावर सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी ते बारामतीत काही दिवसांसाठी आले आहेत. १४ जूनला कंपनीच्या मोकळ्या जागेत त्यांनी कामासाठी आलेली २ लाख १३ हजार रुपयांची केबल उतरवून घेतली. दिवसभर काम केल्यानंतर अल्ताफ शेख व परमेश्वर साळुंखे या दोघा वाॅचमनला साहित्यावर लक्ष ठेवायला सांगून ते घरी आले. दुसऱ्या दिवशी वाॅचमनने येथून केबल चोरीला गेली असल्याचे फिर्यादीला कळवले. घटनास्थळी जात पाहणी केली असता पाॅलिकॅब कंपनीच्या केबलची बंडले अज्ञाताने चोरून नेल्याचे दिसून आले होते.

    याबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, महेश विधाते, हवालदार भानुदास बंडगर, राहूल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे, सिद्धार्थ टिंगरे, ओंकार जाधव आदींनी गायकवाड व साळुंखे यांना माहितीच्या आधारे ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून चोरीची २ लाख १० हजारांची केबल हस्तगत करण्यात आली आहे.