कवठे येमाईत वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

कवठे येमाई  :  शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई गावात आज नव्याने ३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यात कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,एक औषध निर्माता व एक परिचर असे तीन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून तालुक्यात आज ५४ जण कोरोना बाधित झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. 

कवठे येमाईत या आठवड्यात ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असताना आज आणखी ३ जणांचे अवहाल पॉझिटिव्ह आल्याने कवठे येमाईत एकाच आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या ६ वर पोहचल्याने गाव परिसरात मोठीच खळबळ उडाली आहे. गावात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने नागरिकांमध्ये मोठीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळून दि.१८ पर्यंत कवठे गाव बंद ठेवण्याचे आदेश असताना अनेक नागरिक विनाकारण,विनामास्क गावात फिरताना दिसत असून अनेक व्यावसायिक गावात पुन्हा शिरकाव झालेल्या कोरोनाची दाहकता लक्षात न घेता लपून छपून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे सरपंच अरुण मुंजाळ यांनी सांगितले.तर नियम मोडून बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर आता तात्काळ गुन्हे दाखल करणार असल्याचे ही मुंजाळ यांनी सांगितले.

 “कोरोना या घातक विषाणूचा संसर्ग,प्रसार बाधित रुग्नांच्या संपर्कात आल्याने होत असून नागरिकांनी गावात विनाकारण न फिरणे,बंद काळात अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यावसायिकांनी आपापले व्यवसाय काटेकोरपणे बंद ठेवत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.नागरिकांनी घरीच सुरक्षित थांबावे,नाक व तोंडावर मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करतानाच हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत.”

-बाळासाहेब ढवळे पाटील, गटविकास अधिकारी,पंचायत समिती शिरूर