आपटीतील शेतकऱ्याच्या किसान खात्यातून दोन लाख लंपास

    शिक्रापूर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असून, पावसाने देखील दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होत आहे. असे असताना शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या किसान खात्यातून तब्बल दोन लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली. त्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञातावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    आपटी ता. शिरुर संजय गोसावी या शेतकऱ्याचे कोरेगाव भीमा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खाते असून, या बँकेच्या खात्यातून किसान क्रेडीट कार्ड व डेबिट कार्ड गोसावी हे वापरत असताना एप्रिल २०२१ मध्ये गोसावी यांचे किसान कार्ड गहाळ झाल्याने त्यांनी बँकेमध्ये जात बँकेला माहिती देऊन हरविलेले किसान कार्ड बंद करून टाकले. त्यांनतर १ जून २०२१ रोजी गोसावी यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यातून वीस हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी गोसावी यांच्या खात्यात दोन लाख सहा हजार रुपये शिल्लक राहिलेले होते. मात्र, 5 जून २०२१ रोजी गोसावी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये गायब झाल्याचे दिसून आले.

    त्यामुळे त्यांनी खात्याचा तपशील तपासला असताना बँकेच्या खात्यातून तीन जून २०२१ ते ११ जून २०२१ रोजी बँकेच्या खात्यातून वेळोवेळी असे तब्बल दोन लाख रुपये गायब झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत संजय बबन गोसावी (वय ५० वर्षे रा. आपटी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.