‘एल्गार’ प्रकरणी पुण्यातील आणखी दोघे एनआयएच्या ताब्यात

एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील कबीर कलामंचच्या सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना एनआयएने मुंबईत ताब्यात घेतले आहे. तसेच बचाव पक्षाचे वकील मिहीर देसाई यांनी दुजोरा दिला आहे.

 पुणे – एल्गार परिषद प्रकरणी पुण्यातील कबीर कलामंचच्या सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना एनआयएने मुंबईत ताब्यात घेतले आहे. तसेच बचाव पक्षाचे वकील मिहीर देसाई यांनी दुजोरा दिला आहे. पुण्यातील शनिवारवाडा परिसरात ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषद आयोजनात नक्षलवादी संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत देशभरातून १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथील लढाईस २०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. परिषद आयोजनासाठी नक्षलवादी संघटनांनी आर्थिक पुरवठा करण्यासोबतच लोकांना चिथावणी दिल्याचा दावा तपास यंत्रणा यांनी केला आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात तुषार दामगुडे यांनी तक्रार दिली होती. रमेश गायचोर आणि सागर गोरखे यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वीही दोघांवर बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये गायचोर आणि गोरखे महाराष्ट्र एटीएस समोर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या प्रकरणात मे २०१३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.