म्यूकर मायकोसिस काळाबाजार प्रकरणात आणखी दोघे गजाआड

वाकड ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास करत असताना आरोपींच्या मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून ढमामे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली. औषधांचा अवैध पुरवठा गुलबर्गा येथून होत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी गुलबर्गा येथे सापळा लावून आरोपी भजंत्री याला ताब्यात घेतले.

    पिंपरी : म्यूकरमायकोसिस या आजारावरील इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी आणखी दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ इंजेक्शन जप्त केले आहे. या काळाबाजारात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे (वय ३८, रा. विजापूर रोड, सोलापूर), राजशेखर कासाप्पा भजंत्री (वय ३३, रा. गुलबर्गा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी ७ जून रोजी गुंडा स्कॉडने पाच जणांना अटक केली.

    याप्रकरणी वाकड ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास करत असताना आरोपींच्या मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून ढमामे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली. औषधांचा अवैध पुरवठा गुलबर्गा येथून होत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी गुलबर्गा येथे सापळा लावून आरोपी भजंत्री याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८४ हजार रुपये किंमतीचे लिपोसोमोल एमफोटेरिसियिन-बी हे १४ इंजेक्शन आणि ६० हजार रुपये किंमतीचे एमफोटेरिसियिन बी लिपोसोम हे ८ अशी २२ इंजेक्शन जप्त केली.

    आरोपी भजंत्री हा गुलबर्गा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या सरकारी रुग्णालयात कोरोना तसेच म्यूकर मायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफमध्ये आहे. त्यामुळे या गुन्ह्यात मेडिकल कॉलेजमधील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. तसेच आरोपींनी सोलापूर येथे देखील काही औषधे विकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपींवर फसवणूक, विनापरवाना छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने औषध विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.