एसटीच्या ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिक बस होणार दाखल

इंधन दरवाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिक बस दाखल करण्याची हालचाल सुरू झाली आहे. त्यानुसार राज्यातील एसटीच्या सर्व विभागांना ई-बससाठीचे मार्ग निश्चित करण्यासंबंधी आदेश दिला आहे.

    पुणे : इंधन दरवाढीमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ताफ्यात दोन हजार इलेक्ट्रिक बस दाखल करण्याची हालचाल सुरू झाली आहे. त्यानुसार राज्यातील एसटीच्या सर्व विभागांना ई-बससाठीचे मार्ग निश्चित करण्यासंबंधी आदेश दिला आहे.
    केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेअंतर्गत एसटी महामंडळ १०० ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्या बसद्वारे पुणे बस स्थानकातून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, येत्या सहा महिन्यांत पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि महाबळेश्वर या मार्गांवर ई-बसद्वारे सेवा दिली जाणार आहे.

    आता यापुढे जाऊन एसटी महामंडळ ताफ्यात दोन हजार ई-बसचा समावेश करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ई-बसच्या दीडशे फेऱ्यांसाठीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. त्याबरोबरच जादा प्रवासी असलेल्या आणि ई-बस चालवणे शक्य असलेल्या मार्गांची आखणी करून फेऱ्यांचे नियोजन करावे, असे महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व विभाग नियंत्रकांना कळवले होते. त्यानुसार अनेक विभागांनी मार्ग निश्चित करून माहिती पाठवलीदेखील आहे.

    ई-बससाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याचे नियोजन केले जाणार आहे. या चार्जिंग स्टेशनसाठी उच्चदाबाची विद्युत वाहिनी आगारापर्यंत आणण्याचा खर्च एसटी महामंडळाला करावा लागणार आहे. चार्जरची जबाबदारी बस पुरवठादार कंपनीची असणार आहे.