दौंड तालुक्यातील मोठी घटना ! पाटस येथे दोन युवकांची तलवारी आणि दगडाने ठेचून हत्या

    पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे काल रविवारी रात्री दोन युवकांचा काठ्या, तलवारी आणि दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्षात पाहणी केली. दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे मोडीत काढणार असून, या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीसांचे पथके विविध ठिकाणी तैनात केली आहेत. काही आरोपींची माहिती मिळाली असून, लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बोलताना दिली.

    दौंड तालुक्यातील पाटस परिसरातील तामखडा येथील श्री भानोबा मंदिरासमोर रविवारी (दि.4) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवम संतोष शितकल (वय 23), गणेश रमेश माखर (वय २३), दोघेही (रा. पाटस, अंबिकानगर ता.दौंड.जि.पुणे) या दोन युवकांचा काठ्या, तलवारी आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धकादायक घटना घडली. याप्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले (दोघे रा.पाटस तामखडा), योगेश शिंदे (रा. गिरिम ता.दौंड जि.पुणे) व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहीत नाही) असे आठ जणांवर यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पाटसमध्ये रात्रीपासून तणावाची परिस्थिती आहे. कोणताही अनूचित घटना घडू नये, यासाठी पाटस परिसरात पोलीसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला आहे.

    पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. आभिनव देशमुख यांनी सोमवारी (दि.5) घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती जाणून घेतली. या घटनेतील मयत युवक आणि आरोपी हे 20 ते 30 वयोगटातील आहेत. युवकांची गुन्हेगारी वाढत असल्याने देशमुख यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात वाढत चालले अवैध व्यवसाय आणि त्यातूनच वाढत चालेली गुन्हेगारी याला लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलणार असून, गुन्हेगारांची पाळेमुळे शोधून त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे मत डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

    तसेच या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच जिल्हा ग्रामीण पोलीसांची पथके तैनात केली आहे. यावेळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.