पुण्यात असेही घडत आहेत प्रकार! कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्यांसोबत सोसायटीने केलंय असं कृत्य की तुमची मानही शरमेने खाली जाईल

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढत असल्यानं मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार कोल्हापूरहून एक डॉक्टर आणि चार नर्सेस यांची तुकडी गुरुवारी या केंद्रात दाखल झाली. त्यांची राहण्याची सोय इथंच करण्यात आली होती. पण १६ तास काम केल्यानंतर रात्री थोडा वेळ तरी शांत झोप मिळावी या उद्देशानं त्यांनी इथून जवळच असलेल्या एसकेडी पर्ल सोसायटीत (SKD Pearl Society) गणेश देशमुख यांचा फ्लॅट ३० हजार रुपये डिपॉझिट देऊन भाड्यानं घेतला.

  पुणे : सध्या देशभरात उद्भवलेल्या कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेतील (Covid-19 Second Wave) भीषण परिस्थितीत माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना घडत असतानाच दुसरीकडे पुण्यासारख्या (Pune) शहरात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसना घरातून बाहेर काढल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात समजुतीनं प्रश्न न सुटल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

  पुणे मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, कात्रज कोंढवा रोडवरील एसकेडी पर्ल सोसायटीत ही घटना घडली आहे. इथून जवळच असणाऱ्या गोकुळनगर इथं फोरम मेट्रो मेडिकल फाउंडेशनतर्फे (Forum Metro Medical Foundation) उभारण्यात आलेल्या २५ ऑक्सिजन बेड आणि एकूण ७० बेड्स असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Centre-CCC) ३५ जणांचा स्टाफ कार्यरत आहे, मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्मचाऱ्यांवर ताण वाढत असल्यानं मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार कोल्हापूरहून एक डॉक्टर आणि चार नर्सेस यांची तुकडी गुरुवारी या केंद्रात दाखल झाली. त्यांची राहण्याची सोय इथंच करण्यात आली होती. पण १६ तास काम केल्यानंतर रात्री थोडा वेळ तरी शांत झोप मिळावी या उद्देशानं त्यांनी इथून जवळच असलेल्या एसकेडी पर्ल सोसायटीत (SKD Pearl Society) गणेश देशमुख यांचा फ्लॅट ३० हजार रुपये डिपॉझिट देऊन भाड्यानं घेतला.

  बुधवारी हे लोक इथं रहायला आले. मात्र दुसऱ्याच दिवशी घरमालक देशमुख यांनी, सोसायटी विरोध करत असल्यानं तुम्ही इथे येऊ नका असं त्यांना सांगितलं. हे कोविड सेंटरवर काम करणारे लोक असल्यानं त्यांच्यामुळे सोसायटीत या रोगाचा संसर्ग होईल, इथल्या लहान मुलांना धोका उद्भवेल अशी कारणं देत सोसायटीतील अन्य सदस्यांनी देशमुख यांच्यावर दबाव आणून त्यांना या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना फ्लॅटमध्ये येण्यास मनाई करण्यास भाग पाडलं. गुरुवारी असा निरोप मिळाल्यानं अतिशय उद्विग्न झालेल्या या सर्वांनी पुन्हा सेंटरचा आसरा घेतला.

  ‘या आजाराशी, मृत्यूशी लढणं सोपं नाही. आम्ही आमच्या घरापासून लांब फक्त रुग्णांच्या सेवेसाठी इथं आलो आहोत; मात्र लोकांचं हे वागणं अतिशय वेदनादायी आहे,’ अशी भावना यातील एका नर्सने व्यक्त केली.

  दरम्यान, या कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉक्टर रणजित निकम (Dr. Ranjeet Nikam) यांना या प्रकाराबाबत समजल्यानंतर त्यांनीही लोकांच्या वागण्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, डॉक्टर्स, नर्सेस आपला जीव धोक्यात घालून १६-१६ तास काम करत आहेत;पण त्याबद्दल आदर बाळगण्याऐवजी लोकांकडून मिळणारी अशी वागणूक त्यांचे मनोधैर्य खचवणारी आहे.’ सोसायटीनं लहान मुलांना धोका होईल, असं कारण दिलं आहे. मग डॉक्टर्स, नर्सेस यांच्या मुलांचं काय? ते आपल्या मुलांना घरी ठेवून जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांबरोबर सतत काम करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान पोलिसांनी हे प्रकरण समजुतींनी सोडवण्याचा सल्ला दिला आहे. सोसायटीने ऐकलं नाही तर ते यात कारवाई करणार आहेत असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

  पुण्यासारख्या शहरात अशी घटना अतिशय लाजिरवाणी असून, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटत आहेत.