जेजुरीत सोशल मीडियावरून आर्थिक फसवणूकीचे प्रकार

-पोलिसांचेनागरिकांना सतर्कतेचेआवाहन जेजुरी : जेजुरी परिसरामध्ये सध्या तुम्हाला कर्ज देतो,गाडी विकणे आहे अशा फसव्या जाहिराती येत असून त्यातून काही फसवणुकीचे प्रकार घडल्याचे समोर आले

-पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जेजुरी : जेजुरी परिसरामध्ये सध्या तुम्हाला कर्ज देतो,गाडी विकणे आहे अशा फसव्या जाहिराती येत असून त्यातून काही फसवणुकीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.फेसबूक,व्हॉट्सऍप,ओएलएक्स या माध्यमातून ही फसवणूक होत आहे.

जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रकरणामध्ये आरोपीने मी लष्करामध्ये असून माझी गाडी विकायची आहे असे सांगून विश्वास संपादन केला व फिर्यादीला मिलिटरी कॅन्टीनचे कार्ड,आधार कार्ड,पॅन कार्ड पाठवून गोड बोलून एक लाख वीस हजार रुपयांना गंडविले तर दुसऱ्या प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने एका नागरिकाची ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.त्यांना कर्ज देतो असे सांगून सुरुवातीची म्हणून ९० हजार रुपये रक्कम भरण्यास सांगितले तर तिसऱ्या प्रकरणामध्ये तुमचे एटीएम कार्ड बंद होणार आहे असे सांगून गुगल पे नंबर घेतला व सर्व खात्याची माहिती घेऊन आरोपीने सहा टप्प्यांमध्ये ४७ हजार रुपयांची खरेदी केली.फसवणूक झालेल्या नागरिकांनी जेजुरी पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन रीतसर तक्रार नोंदवली आहे.जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो.निरीक्षक अंकुश माने यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली असून सदर आरोपींनी  विश्वास संपादन करण्यासाठी पाठवलेली ओळखपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.सायबर क्राईम ब्रँच मार्फत या आरोपींचा शोध घेतला जात आहे.कोणत्याही भूलथापांना बळी पडून आर्थिक व्यवहार करू नये अन्यथा आपण मोठ्या आर्थिक फसवणुकीची शिकार होताल असा इशारा जेजुरी पोलिसांनी दिला आहे. लॉक डाऊन च्या काळात सायबर गुन्हेगार सक्रीय झाल्याचे दिसत आहेत.