गॅस गळतीमुळे कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू

गॅस गळतीचं प्रकरण लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत डॉक्टर विश्वास झाडेंच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आलं.

    चंद्रपूर: चंद्रपूरमधील दूर्गापुर येथे जनरेटरमधील गॅस गळतीमुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासहीत अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. दरम्यान डॉक्टर विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे सांगत आहे.

    रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. त्यामधील एकाचे प्राण वाचले आहेत. गॅस गळतीचं प्रकरण लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना बेशुद्धावस्थेत डॉक्टर विश्वास झाडेंच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथे सहा जणांना मृत घोषित करण्यात आलं. तर एका सदस्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलं आहे .