राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे यांच्यावर अज्ञाताकडून गोळीबार; उपचारासाठी रुग्णालयातदाखल

जखमी अवस्थेतील तावरे यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात.

    माळेगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

    रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघां जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता.

    जखमी अवस्थेतील तावरे यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते.