कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळांचा एकमुखी निर्णय

आळंदी : कोरोनाच प्रादुर्भावामुळे सर्वच सण, उत्सवांवर गदा आली आहे. त्यातच अवघ्या १० दिवसांवर गणेशोत्सव आला असून त्यावरही करोनाचे संकट असल्याने यंदा आळंदी शहरात मंडपाविना गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतला आहे. तर इंद्रायणी नदीत श्रींच्या मूर्ती विसर्जनास बंदी घातली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आळंदी पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र चौधर, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे, पांडुरंग वहीले, सागर भोसले, तुषार घुंडरे, अशोक उमरगेकर, माउली रायकर, आनंद मुंगसे, दिनेश कुऱ्हाडे, रोहन कुऱ्हाडे, भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ज्या गणेश उत्सव मंडळांचे मंदिर आहे ते मंदिरातच तर ज्यांची मंदिरे नाहीत ते सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन एकच गणेश मूर्ती ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याचा सुत्य निर्णय सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतल्याने या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

-इंद्रायणी घाटावर विसर्जनास बंदी

आळंदी शहरातील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी घरगुती गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन कराव. इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनास बंदी असल्याने कोणीही घाटावर विसर्जननास येऊ नये. तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणूक काढू नये, असे आवाहन आळंदी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनांकडून करण्यात आले आहे.