दूर्दैवी! सिमेंट जंगलात धावता धावता थकला ; अन प्राणास मुकला ‘रानगवा’

लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे रानगवा बिथरला. डार्ट मारल्यानंतर त्याची धावाधाव झाल्यामुळे घाबरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकणार आहे,” अशी माहिती वन अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे

पुणे : कोथरुड परिसरात सकाळी जवळपास पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन धावपळीनंतर पकडण्यात आलेल्या रानगव्याचा मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली आहे. कोथरूड परिसरात घुसलेल्या या रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं होतं. गव्यावर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं होतं. पण यावेळी रानगवा जखमी झाला होता. त्याच्या तोंडातून रक्त वाहत होतं. अखेर त्याचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.

“कोथरूड भागात आज सकाळच्या सुमारास रानगवा नागरिकांना दिसून आल्यानंतर आम्हाला याबाबत माहिती देण्यात आली. आम्ही काही वेळात घटनास्थळी पोहचलो. त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे रानगवा बिथरला. डार्ट मारल्यानंतर त्याची धावाधाव झाल्यामुळे घाबरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकणार आहे,” अशी माहिती वन अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.

कोथरूडमध्ये गवा शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली, त्यातूनच बघ्यांची गर्दी जमा झाली. वनविभाग व पोलिसांना मदत करण्यापेक्षा फोटो काढण्यामध्ये अधिक रस असल्याने बघेही रानगव्याच्या मागे धावत सुटले. त्यातूनच बिथरलेला रानगवा वाहन व भिंतीना धडकून जखमी झाला होता. सोशलमीडियावर व्हायरल झालेले फोटो व व्हडिओच अनेक गोष्टींचा उलगडा करून जातात. तब्बल पाच तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन एकाही व्यक्तीला जखमी न करणारा रानगाव स्वतःच्या प्राणास मात्र मुकला.