अवेळी पावसाचा केळीबागांना फटका

बारामती : टाळेबंदीमुळे शेतीमालाच्या वितरणावर होणारा परिणाम तसेच सध्या बाजारात फळांना मागणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.बारामती तालुक्यात झालेल्या अवेळी पावसामुळे केळीबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 भाजीपाल्याच्या उत्पादनावरही परिणाम

बारामती : टाळेबंदीमुळे शेतीमालाच्या वितरणावर होणारा परिणाम तसेच सध्या बाजारात फळांना मागणी नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.बारामती तालुक्यात झालेल्या अवेळी पावसामुळे केळीबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
प्रशासनाकडून ९० टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत.उर्वरित भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. बारामती तालुक्यातील निंबूत, वाणेवाडी, सोरटेवाडी, जळोची, डोर्लेवाडी, झारगडवाडी, गुणवडी, माळेगाव, कऱ्हावागज, मेडद, कटफळ या गावातील ७० हेक्टर  क्षेत्र बाधित झाले आहे.विक्रीसाठी तयार झालेल्या केळीबागेचे पीक जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले असून शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा या भागातील शेतक ऱ्यांकडून करण्यात आली आहे.
-पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
बारामती तालुक्यातील गुणवडी बांदलवाडी येथील नितीन बाबर यांच्या सहा एकर तसेच विजय गोरे यांच्या केळीबागेचे अवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. बाबर आणि गोरे यांच्या बागेतील केळीचे पीक तयार झाले होते.बाजारात केळी विक्रीसाठी पाठविण्याची तयारी सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे केळीबागेचे नुकसान झाले. अवेळी झालेल्या पावसामुळे बाबर यांचे ५ ते ६ लाख रुपये आणि गोरे यांच्या ३ एकरावर असलेल्या केळीबागेचे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
-अवेळी पावसाचा पिकांवर परिणाम
बारामती तालुक्यात झालेल्या अवेळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यातील काही भागात महिन्याभरापूर्वी लागवड केलेल्या मका, कांदा तसेच भाजीपाल्यावरही परिणाम होणार आहे.करोना तसेच अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.