…तोपर्यंत धनगरांनी भाजपच्या मराठा आंदोलनात सहभागी होऊ नये; राष्ट्रवादीच्या मासाळ यांचे आवाहन

    बारामती : भाजपच्या पोस्टरवर जोपर्यंत धनगर आरक्षण येत नाही, तोपर्यंत धनगरांनी भाजपच्या ओबीसी कम मराठा आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी ‌केले आहे.

    याबाबत अधिक माहिती देताना किशोर मासाळ म्हणाले, स्थानिक संस्थांमधील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने ओबीसी वर्गावर मोठा अन्याय झाला आहे. ओबीसींना अन्यायाची अजूनही जाणीव नसल्याने ओबीसी झोपलेल्या अवस्थेतच आहे. ओबीसी आरक्षणावरुन भाजपने राज्यभर रान पेटवण्याचा नियोजित कार्यक्रम २६ जूनला आयोजित केला असून २४ जूनपर्यंत फक्त ओबीसी आरक्षणावर चर्चा व आंदोलनाचे नियोजन सुरू होते.

    पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत असल्याच्या बातम्या येताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची बैठक घेत ओबीसी आंदोलनाच्या बॅनरवर मोठ्या शिताफीने मराठा, ओबीसी आंदोलन असा बदल करुन मराठ्यांना भाजपकडे आकर्षित करण्याचा नवा डाव टाकून पंकजाच्या ओबीसी गर्जनेला मराठा आंदोलनाचा फास दिला आहे.

    भाजपच्या ओबीसी आंदोलनात राज्यभर गर्दी जमवण्यासाठी ओबीसीतील धनगर आणि वंजारी समाजाला तयार करण्यात आले होते. मात्र, आज भाजपच्या बैठकीत झालेल्या मराठा, ओबीसी आंदोलनाच्या घोषणेमुळे धनगर समाज पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात जाण्याच्या तयारीला लागला आहे. राज्यातील धनगर समाजावर भाजपने सत्तेच्या काळातही अन्याय केला आणि आताही भावनिक करुन वापरून घेण्याच्या तयारीत दिसल्याने व्यथित झाला आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटले की, राज्य शासनाने दीड वर्षात ओबीसीची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडली नाही, म्हणून चाळीस वर्षांच्या इतिहासात ओबीसी आरक्षणाच्या बाहेर फेकले गेले. तर मंत्री छगन भुजबळ भाजपवर टीका करताना म्हणाले की, इंपिरिअल डाटा मोदी सरकारने दिला नाही. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असून सत्तेच्या सात वर्षाच्या काळात त्यांनी ओबीसीसाठी काहीही केलेले नाही.

    एकंदरीत ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण हे मुद्दे सहज मते मिळवण्याचे मार्ग झाले असून, समाज अशा भूलथापांना बळी पडून सापनाथाकडील सत्ता नागनाथाच्या हातात देत बसतो. काँग्रेस राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर धनगरांचा एकही प्रश्न नाही. मात्र, भाजपने तर सत्ता भोगलेली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना स्वतःच्या आरक्षणाचा विचार एकदा तरी करावा. भाजपच्या आंदोलनाच्या पोस्टरवर जोपर्यंत धनगर आरक्षण येत नाही, तोपर्यंत धनगरांनी भाजपच्या ओबीसी कम मराठा आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन मासाळ ‌यांनी‌ केले आहे.