…तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडू देणार नाही; खवणी ग्रामस्थांची भूमिका

  मोहोळ : जोपर्यंत ग्रामसेवक आणि गाव कामगार तलाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडू न देण्याची भूमिका खवणी (ता. मोहोळ) येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी घेतली आहे. यावेळी उपसरपंच सिंधू बोबडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश खिलारे, ग्रामपंचायत सदस्या रेखा भोसले, सुरेखा भोसले, तुकाराम भोसले, सचिन भोसले, ज्योतीराम भोसले, तेजस बोबडे, देविदास भोसले, मंगेश गुंड, शिवाजी खिलारे, सहदेव यमगर, कृष्णात भोसले, प्रेम खिलारे इत्यादी उपस्थित होते.

  सदस्य, ग्रामस्थांचे नाेंदविले जबाब

  ग्रामसेवक व तलाठी गावात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांनी दि. ३१ मे पासून खवणी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. याबाबत माहिती घेण्यासाठी दि. ३ जून रोजी मोहोळ तालुका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बागवाले, विस्तार अधिकारी ग्रापंचायत अरुण वाघमोडे यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची भेट घेवून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. यावेळी ग्रामपंचायतीचे सात पैकी पाच सदस्य उपस्थित होते.

  ग्रामपंचायत स्तरावरील कामे रखडली

  ग्रामसेवक मिलिंद तांबिले गेली दोन महिने गैरहजर आहेत, तर गावकामगार तलाठी मंगेश बनसोडे सात महिन्यापासून गावी आलेले नाहीत. कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करणे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवणे यामध्ये त्यांचा कसलाही सहभाग नाही. शिवाय गावातील शेतकऱ्यांच्या वारसांच्या नोंदी, गट विभाजनाची कामे थांबली आहेत. गावातील गटारी तुंबून अस्वच्छता झाली आहे. दिवाबत्ती बंद, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन नादुरुस्त, सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा विद्युत पंप जळाला आहे. अशा अनंत अडचणीतून ग्रामस्थांना जावे लागत असून ग्रामस्थ हि कामे वर्गणी जमा करून करीत आहेत, असे भाजप अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव संजीव खिलारे, सरपंच शीतल यमगर यांनी सांिगतले.

  ग्रामसेवक मिलिंद तांबिले यांनी ग्रामपंचायतीचे खाते पुस्तक, दैनंदिन जमाखर्च नोंद वही व इतर ग्रामपंचायतीचे दप्तर ग्रामपंचायत सदस्यांना दाखविले नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून खवणी गावांसाठी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा आमचे ग्रामपंचायत कार्यालयाला ‘टाळे ठोको आंदोलन सुरूच राहील, असे सरपंच शीतल यमगर यांनी सांगितले.