आंबेगाव तालुक्यात राबविणार लसीकरणाची धडक मोहिम

    पुणे : आंबेगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करणे व मृत्युदर राज्य स्तर व जिल्हा स्तर यांच्या तुलनेत कमी ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची उपलब्धता शासन स्तरावरून सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर करून दिल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.

    महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस राहिलेले व दुसरा डोस घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना ३१ ऑगस्ट सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेमध्ये एकाच दिवशी संपूर्ण आंबेगांव तालुक्यात ३० हजार लसीकरणाचा नवा विक्रम करुन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी ही धडक मोहिम राबवून कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम निश्चित केला आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे यांनी केले आहे.

    दरम्यान, ही लस पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून उपलब्ध झाली असून, लसीकरणाचा कार्यक्रम आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे.