पुणे शहरातील लसीकरण तूर्तास बंद राहाणार! ; लसींचा पुरवठा थांबल्याने सलग दुसर्‍या दिवशी लसीकरण बंद

लसींचे प्रमाणही कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगा लावूनही लस मिळत नाही. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे. अशातच आज सलग दुसर्‍या दिवशी केंद्र शासनाकडून राज्य शासनामार्फत मिळणार्‍या लसींचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे काल शहरातील सर्वच केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंतही लसींबाबत कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने आजही लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतील, अशी शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

    पुणे : केंद्र सरकारने १८ वर्ष वयापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी कालपासून कोविन ऍपवर नोंदणी सुरू केली आहे. मात्र, मागील साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरणासाठी सलग दुसर्‍या दिवशी लसच मिळाली नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. लसींच्या पुरवठ्याच्या या घोळामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    शहरात १८२ लसीकरण केंद्र असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत पुणे महापालिकेने आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षावरील नागरिकांना सुमारे साडेसात लाख डोस दिले आहेत. तर केंद्र सरकारने येत्या १ जानेवारीपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा केली आहे. परंतू राज्यातच नव्हे तर संपुर्ण देशभरामध्ये मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी असल्याने मागील काही दिवसांपासून लसीकरण प्रक्रिया मंदावली आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये काही केंद्र बंद ठेवावी लागत असून उपलब्ध आहे, त्याठिकाणी लसींचे प्रमाणही कमी असल्याने नागरिकांना तासनतास रांगा लावूनही लस मिळत नाही. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे. अशातच काल सलग दुसर्‍या दिवशी केंद्र शासनाकडून राज्य शासनामार्फत मिळणार्‍या लसींचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे काल शहरातील सर्वच केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. काल संध्याकाळी सात वाजेपर्यंतही लसींबाबत कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने आजही लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतील, अशी शक्यता आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

    सध्या लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी महाापलिका प्रशासन तयारी करत आहे. परंतू जोपर्यंत महापालिकेला पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. तसेच लसीकरणासंदर्भात राज्य अथवा केंद्र शासनाच्या नवीन गाईडलाईन्स येत नाहीत, तोपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात यावेत. तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे सर्वच केंद्रांवर समप्रमाणात वाटप करून गोंधळ टाळण्यासाठी केवळ टोकन पद्धत अवलंबावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

    - हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती