जिल्ह्यात एकाच दिवशी अडीच लाख जणांचे लसीकरण; जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात बजाज ग्रुप व शासनाकडील उपलब्ध करून देण्यात आलेली कोविशील्ड लसीचे एकाच दिवसात २ लाख ५४ हजार २६३ लाभार्थ्यांना डोस देण्यात येऊन लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. ही मोहीम यशस्वीपणे राबविणार्‍या जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

    पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ३१ ऑगस्ट २०२१ रोजी बजाज कोविड-१९ मेगा लसीकरण दिवस साजरा करण्यात आला. बजाज कंपनीकडून १५ लाख कोविशिल्ड लसीचे डोसेस आणि त्यासाठी लागणाऱ्या एक लाख ७७ हजार एडी सिरिजेस उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर लसीकरणानंतर फोटो काढण्यासाठी ५०० सेल्फी स्टॅन्ड व लसीकरणाविषयी माहिती देणारे ५०० स्टॅन्ड बजाज कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शासनाकडील उपलब्ध करून देण्यात आलेली कोविशिल्ड लस अशी एकूण २,५४,२६३ लाभार्थ्यांना एकाच दिवसात संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा लसीचा डोस देऊन लसीकरणाच्या इतिहासातील नाविन्यपूर्ण विक्रम करण्यात आला.

    पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात ५५९ लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते व त्यात २२३६ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेसाठी ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा सत्कार पुणे जिल्हा परिषद कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व इतर सर्व जिल्हा परिषदेचे मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धनंजय घाटे यांनी दिली.