चार महिन्यांपासून बंद असलेला वरंधा घाट आता वाहतुकीसाठी होणार खुला

  भोर (प्रतिनिधी) : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट १० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. १० फेब्रुवारीपासून महाड हद्दीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद होता. महाड हद्दीतील दुरूस्तीची मोठी कामे किरकोळ अपवाद वगळता उरकली आहेत. त्यामुळे तो वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती महाडचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांनी दिली.

  गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील संरक्षक भिंत कोसळली होती. महाड हद्दीत तेरा धोकादायक ठिकाणे, काही संरक्षक भिंती, साईड पट्यांची खराबी झाली होती. दुरूस्तीची जागा अतिदुर्गम सह्याद्री पर्वत रांगामध्ये आहे. रस्त्याचे एकावर एक तीन थर आहेत. रूंदी सात ते नऊ मीटर आहे. दुरूस्तीसाठी ५ कोटी ४० लाख ५५ हजार रूपये मंजूर झाले. संरक्षक भिंतीचे काम करताना खोलवर खोदाई व अनेक ठिकाणी ब्लास्टिंग करावे लागले, असे शाखा अभियंता डी. एल. पराते यांनी सांगितले. ३० एप्रिलपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कामाला उशिर झाला.

  भोर ते महाड हे अंतर ८४ किमीचे आहे. महाड, रत्नागिरी, दापोली, खेड, केळशी, माखजन, पोलादपूर चांदवणे येथून पुणे, चिंचवड, जळगाव, औरंगाबाद, अंबेजोगाई, अक्कलकोट अशा २३ एसटी बसेस धावतात. खाजगी वाहनांची वर्दळही मोठी असते. तर पर्यटकसुद्धा अनेकदा हाच मार्ग निवडतात.

  पाऊस संपल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होणार

  भोर ह्द्दीतील वारवंड ते शिरगांव या १२ किमीच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. डांबर निघाले आहे. कामासाठी साडेसात कोटी रूपये मंजूर झाले आहेत. कामाच्या निविदाही मंजूर झाल्या आहेत. दरवर्षी येथे पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडतो. पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्याची कामे करायची नाहीत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याने ठेकेदारांना दिल्या आहेत. पाऊस संपल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होईल.

  मुख्य कामे पूर्ण

  रस्त्यावरील मोठे खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येणार नसल्याचे भोरचे उपकार्यकारी अभियंता संजय वागज यांनी सांगितले. काम सुरू झाल्यावर लॉकडाऊनमुळे कामास थोडा विलंब झाला. पण मुख्य काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे सुरू राहतील. त्यामुळे वाहतुकीस काही अडथळा येणार नाही, असे आर. के. बामणे यांनी सांगितले.