लॉकडाऊन काळातील जप्त वाहने परत मिळणार

गेल्या दोन महिन्यांत ४५ हजारांहून जास्त वाहने जप्त वाहनचालकाला अनामत रक्कम, बंधपत्र देण्याची सूचना पुणे : संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत ४५ हजारांहून जास्त

गेल्या दोन महिन्यांत ४५ हजारांहून जास्त वाहने जप्त

वाहनचालकाला अनामत रक्कम, बंधपत्र देण्याची सूचना


पुणे : संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत ४५ हजारांहून जास्त वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेली दुचाकी, चारचाकी वाहने वाहनचालकांना परत देण्यात येणार आहेत. दुचाकीसाठी अडीच हजार रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी पाच हजार रुपयांची रक्कम अनामत म्हणून पोलिसांकडे जमा करावी लागणार असून वाहनमालकांना पोलिसांकडे बंधपत्र (बाँड) भरून द्यावे लागणार आहे.

संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत ४५ हजार वाहने जप्त केली आहेत. कठोर र्निबध काहीसे शिथिल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मूळ वाहनमालकांना वाहने परत देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी वाहनमालकांना जप्त करण्यात आलेली वाहने परत नेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर वाहनचालकांना वाहने ताब्यात देण्यात येणार आहेत. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन जप्त करण्यात आले आहे, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकास वाहनचालकाने अर्ज सादर करण्याची गरज आहे. अर्ज सादर करताना वाहनचालकांना बंधपत्र (बाँड) सादर करावा लागणार आहे. दुचाकीसाठी अडीच हजार आणि चारचाकी वाहनांसाठी पाच हजार रुपये जमा करावे लागणार आहेत.

संचारबंदीचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जप्त करण्यात आलेली वाहने परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या वाहनचालकाचे वाहन जप्त करण्यात आले असेल, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात जावे. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडे अर्ज सादर करावा तसेच अनामत रक्कमही जमा करावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

अनामत रक्कम परत मिळेल पण..

संचारबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी ज्या वाहनचालकाविरोधात खटला दाखल झाला आहे अशा खटल्यात न्यायालयाने चालकाला दंड सुनावला, तर अनामत रक्कम परत केली जाणार नाही. त्यामुळे दंडाएवढीच रक्कम वाहनचालकांकडून जमा करण्यात येत आहे. जर वाहनचालक निर्दोष ठरला तर अनामत रक्कमही परत केली जाणार आहे.