हप्ता देण्यास नकार दिल्याने केली वाहनांची तोडफोड

  पिंपरी : इमारतीसमोर टेम्पो पार्क करण्यासाठी भाजी विक्रेत्यांकडे सुरक्षारक्षकाने हप्ता मागितला. मात्र, भाजी विक्रेत्यांनी हप्ता देण्यास नकार दिला. यावरून सुरक्षारक्षकासह पाच जणांच्या टोळक्याने १३ टेम्पोची तोडफोड केली. तसेच या टोळक्याने एकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. याबाबत पाच जणांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  हा प्रकार शुक्रवारी (दि. ११) सकाळी म्हातोबानगर, वाकड येथे उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी सुरक्षारक्षक किरण प्रकाश घाडगे (वय २५), चंद्रकांत सीताराम गायकवाड (वय २२), मयूर संजय अडागळे (वय २६), सागर प्रकाश घाडगे (वय २७, सर्व रा. म्हातोबानगर, वाकड), अविनाश नलावडे (रा. आदर्शनगर, वाकड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी मारुती साहेबराव काळे (वय ३०, रा. म्हातोबानगर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण घाडगे हा म्हातोबानगर येथील एका व्यावसायिक वापराच्या इमारतीचा सुरक्षारक्षक आहे. या इमारतीसमोर म्हातोबानगर परिसरातील भाजी विक्रेते त्यांचे टेम्पो पार्क करतात. मागील काही दिवसांपासून किरण घाडगे भाजी विक्रेत्यांकडे टेम्पो पार्क करण्यासाठी हप्ता मागत होता. मात्र, भाजी विक्रेत्यांनी किरण याला हप्ता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो चिडून होता.

  गुरुवारी रात्री फिर्यादी काळे टेम्पो पार्क करून रस्त्यावर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे होते. त्यावेळी घाडगे याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडे ‘महिना दोन हजार रूपये हप्ता द्या. नसता तुम्हाला धंदा करू देणार नाही’, अशी मागणी केली. त्यावर काळे यांनी हप्ता देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी किरण घाडगे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तेरा टेम्पोची तोडफोड केली. टेम्पोची तोडफोड केल्यानंतर सचिन अशोक शेलार (वय २६, रा. म्हातोबानगर, वाकड) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शेलार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी मारहाण करीत त्यांच्या खिशातील ६०० रुपये जबरदस्ती काढून घेतले. याबाबत शेलार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  भोसरीत ही दोन वाहनांची तोडफोड

  शास्त्री चौक, भोसरी याठिकाणी रस्त्यालगत मोकळ्या जागेत उभी केलेली दोन वाहने टोळक्याने फोडली. गुरूवारी (दि.१०) हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरमान देशमुख, सनी चिवे (दोघेही रा. कासारवाडी) व इतर चार अनोळखी तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैजनाथ सदाशिव आडागळे (वय ५२, रा. पारिजात कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी शुक्रवारी (दि.११) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा ट्रक (एमएच १४ / व्ही ०५९२) हा विसावा हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत पार्क केला होता. या ट्रकच्या काचा आरोपींनी फोडल्या. तसेच, राजेश वाटकर यांच्या मालकीची कारच्या (एमएच १४/एच क्यू २४२१) देखील काचा फोडून नुकसान केले. सहाय्यक पोलीस फौजदार केके बुढे अधिक तपास करीत आहेत.