पशूवैद्यकांना प्राधान्याने प्रतिबंधात्मक लस द्यावी  ; फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी

खासगी पशुवैद्यकांना शासनाने फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. तालुक्यातील पशुवैद्यकांची ही मागणी शासन दरबारी लवकरात लवकर पोहोचावी व लवकरात लवकर आम्हाला या सुविधा मिळाव्यात म्हणून संघटनेच्या वतीने आमदार अॅड. अशोक पवार यांना निवेदन देण्यात आल्याचे डॉ. संजय कळसकर, डॉ. गणेश पवार, डॉ. प्रताप घाडगे, डॉ.खोरे, डॉ. गवळी यांनी सांगितले. 

  कवठे येमाई : शिरूर तालुक्यात खासगी पशू वैद्यकांची संख्या मोठी असून शासनाने त्यांचा अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करून फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवून कोव्हीड -१९ प्रतिबंधात्मक लस प्राधान्याने द्यावी, अशी मागणी तांदळी येथील पशुवैद्यक डॉ. संजय कळसकर व इतर खासगी पशुवैद्यकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
   पशूधनाची अविरतपणे सेवा 
  तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी शेती बरोबरच प्राधान्याने पशूपालन करतात. ग्रामीण भागात कार्यरत असणारे खासगी लघू पशूवैद्यक कोरोनाच्या भयावह काळात  खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यांवर जाऊन शेतकऱ्यांकडे असणाऱ्या पशूधनाची अविरतपणे सेवा करीत आहेत. शासनाकडून मात्र ग्रामीण भागातील पशूवैद्यक दुर्लक्षितच राहिले आहेत.  पशुवैद्यकांना रात्री अपरात्री थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन सेवा द्यावी लागते. सेवा देताना परिसरातील असंख्य शेतकऱ्यांशी व त्यांच्या कुटुंबियांशी पशुवैद्यकांचा सातत्याने संपर्क येत असतो, असे डॉ. कळसकर यांनी सांगितले.
  लवकरात लवकर  सुविधा मिळाव्या
  खासगी पशुवैद्यकांना शासनाने फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करणे आवश्यक आहे. तालुक्यातील पशुवैद्यकांची ही मागणी शासन दरबारी लवकरात लवकर पोहोचावी व लवकरात लवकर आम्हाला या सुविधा मिळाव्यात म्हणून संघटनेच्या वतीने आमदार अॅड. अशोक पवार यांना निवेदन देण्यात आल्याचे डॉ. संजय कळसकर, डॉ. गणेश पवार, डॉ. प्रताप घाडगे, डॉ.खोरे, डॉ. गवळी यांनी सांगितले.

  अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असतानाही सांगत नाहीत. त्यातूनच जर एखाद्या पशूवैद्यकाला कोरोनाची लागण झाली तर तो कोरोनाचा वाहक ठरण्याचा खूप मोठा धोका आहे. आतापर्यंत अनेक पशू वैद्यकांना कोरोनाच्या संसर्गामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

  -डॉ. संजय कळसकर, पशूवैद्यक