पुणे पोलिसांच्या गलथनपणाचा बळी : आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू

सुरेश पिंगळे हे खासगी कंपनीत नोकरीस होते. त्यांचे वर्षाला कॉन्ट्रॅक्ट बदलत असत. त्यामुळे त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागत होते. त्यानुसार त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता.

    पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळे यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांचा आज सायंकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. पुणे पोलिसांच्या गलथानपणाचा सुरेश पिंगळे बळी ठरले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

    सुरेश विठ्ठल पिंगळे (वय 42, रा. खडकी) असे मृत्यू झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची नोंद बंडगार्डन पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

    सुरेश पिंगळे हे खासगी कंपनीत नोकरीस होते. त्यांचे वर्षाला कॉन्ट्रॅक्ट बदलत असत. त्यामुळे त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन करावे लागत होते. त्यानुसार त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. तो अर्ज विशेष शाखेकडे आला होता. त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. ते गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. दरम्यान पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुरेश पिंगळे नावाच्या व्यक्तीवर पोलिसांकडे तीन गुन्हे दाखल होते. त्याबाबत माहिती घेतली जात होती. दोन पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाली. पण, एका ठाण्याकडून माहिती आलेली नव्हती. त्यामुळे त्यांचे व्हेरिफिकेशनला वेळ लागत होता. पण, सुरेश यांच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगत आहेत. फक्त नाव साधार्म यामुळे हा घोळ सुरू होता, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यात सुरेश पिंगळे हे नैराश्यात होते. त्यातून त्यांनी बुधवारी सकाळी स्वतःला पवटवून घेतले. तसेच, त्यांनी पेटलेल्या अवस्थेत आयुक्तालयात धाव घेतली. त्यानंतर येथील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण, दुर्दैवाने त्यांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. दरम्यान पेटवून घेण्याआधी सुरेश यांनी हाताची नस देखील कापून घेतली होती.

    सुरेश यांच्या पत्नीचे गंभीर आरोप

    पत्नीने पुणे पोलिसांवर धक्कादायक आरोप केले आहेत. पोलिसांच्या गलथान कारभारामुळे माझ्या पतीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी बुधवारी सांगितले होते. पोलीस आयुक्तलयात ते  चकरा मारत होते. परंतु त्यांना ते वेळेत मिळाले नाही. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात होते. परंतु त्यांच्यावर मात्र आजवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही. असे असतानाही त्यांना पोलीस वेरिफिकेशन मिळत नव्हते. त्याला सर्वस्वी पोलिस कारणीभूत आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांनी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे.