विजयस्तंभ अभिवादन : कोरेगाव भीमा येथील अभिवादन कार्यक्रम साधेपणाने होणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.कोरोनाचा पार्श्वभूमीवर हा अभिवादन सोहळा प्रतिकात्मक स्वरूपात शांततेने, संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.कोरोनाचा पार्श्वभूमीवर हा अभिवादन सोहळा प्रतिकात्मक स्वरूपात शांततेने, संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभ १ जानेवारी रोजी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रम तयारीची काल बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, उप विभागीय अधिकारी सचिन बारवकर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली तहसिलदार सुनिल कोळी, शिरुरचे तहसिलदार लैला शेख, नायब तहसिलदार श्रीशैल वट्टे, कार्यकारी अभियंता जे. ए. थोरात, किशोर शिगोंटे, अ. द. कोकाटे, सी. एम. ढवळे, कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सरपंच रुपेश ठोंबरे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोना विरुद्ध लढत आहे. कोरोना विषाणूवर अद्यापपर्यंत लस आलेली नाही. तसेच कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कार्यक्रमास गर्दी करु नये. अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करत असतांना आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले. बैठकीपूर्वी विजयस्तंभास जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी अभिवादन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करीत असतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे.कोरोनासंकट लक्षात घेऊन यावर्षी सर्व सण-समारंभ साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घेत कार्यक्रम साजरा करुया, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ देशमुख यांनी केले.