वाळूतस्कर परप्रांतीयांकडे गावठी कट्टे ; वाळू उपशावर कारवाई करण्याची मागणी

राजेगाव :भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांना आता गावठी कट्टेही वापरण्याचे परवाने दिले आहेत का?असा सवाल या मच्छीमार भूमिपुत्रांनी केला आहे. वाळू उपसा करण्यासाठी यांत्रिक बोटी भीमा नदी पात्रात खेड व राजेगाव हद्दीत येत आहेत. यामध्ये असणाऱ्या परप्रांतीयांकडून मच्छीमारांच्या जीविताशी धोकादायक खेळ खेळला जात आहे

राजेगाव :भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या परप्रांतीयांना आता गावठी कट्टेही वापरण्याचे परवाने दिले आहेत का?असा सवाल या मच्छीमार भूमिपुत्रांनी केला आहे. वाळू उपसा करण्यासाठी यांत्रिक बोटी भीमा नदी पात्रात खेड व राजेगाव हद्दीत येत आहेत. यामध्ये असणाऱ्या परप्रांतीयांकडून मच्छीमारांच्या जीविताशी धोकादायक खेळ खेळला जात आहे. वाळू उपसत असताना त्यांच्याकडून गावठी कट्ट्याचा वापर करत पाण्यातील पाणकोंबड्या मारण्याचा पराक्रम सुरू असून दोन दिवसांपुर्वी राजेगाव (ता.दौंड) येथील संदिप भोई या मच्छीमाराच्या होडीला गावठी कट्ट्याच्या काडतुसाचा प्रहार झाल्याने त्यांनी भयभीत होऊन मासे व होडी सोडून आपल्या घराकडे पलायन केले.

गेली अनेक वर्षांपासून महसूल यंत्रणेच्या आशीर्वादाने सोकावलेल्या वाळू तस्करांचा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.आजतागायत भीमा पात्रातील गौण खनिजाची महसुलच्या आशीर्वादाने सुरू असलेली लुट थांबवता आली नाही वाळू उपशाचा सपाटा ‘चोरी चोरी-चुपके चुपके’ सुरूच ठेवला आहे.त्यामुळे या भागातील सुरू असलेल्या उपशावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व मच्छीमार संघटनेने केली आहे.या भागातील वाळू उपशावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

परप्रांतीयांसह वाळूतस्कर मालकांवर गुन्हे दाखल करा-राहुल नगरे
भीमा नदी पात्रात मच्छीमारी करून हजारो कुटुंबे आपली उपजीविका भागवतात मात्र यांत्रिक बोटींमुळे मासे पकडण्याची जाळी फाटत आहेत. हे नुकसान तर वारंवार सहन करावे लागत असुन आता गावठी कट्टे वापरून दहशत निर्माण करणाऱ्या परप्रांतीयांमुळे स्थानिक मच्छीमार भूमिपुत्रांना दहशतीखाली जगावे लागत आहे.त्यामुळे परप्रांतीयांसह वाळू तस्कर मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी दौंड तालुका मच्छीमार संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल नगरे यांनी केली आहे.